“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:52 IST2025-05-21T15:45:58+5:302025-05-21T15:52:13+5:30
Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर भारताने दिले. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. यातच राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. याला भाजपाने प्रत्युत्तर दिले. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक महिला उलटला. परंतु, या कटात सामील असलेले दहशतवादी सापडले नसल्याबाबत काँग्रेसने केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे.
राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे, चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकला नसता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, आंबे कोणी पाठवले
पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली, जिन्ना यांना क्लीन चिट कोणी दिली, लालकृष्ण अडवाणींनी दिली. जिन्ना यांची प्रशंसा कोणी केली, जसवंत सिंह यांनी केली. लाहोर बस कोणी सुरू केला, अटल बिहारी वाजपेयींनी केला. नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले होते, शाल कोणी पाठवली होती, नरेंद्र मोदींनी पाठवली होती, असा पलटवार जयराम रमेश यांनी केला.
दहशतवादी पकडले गेले नाहीत, त्यांना अटक करा
आम्ही इकडे कागदपत्रे तयार करत आहोत; पण, दहशतवादी तिथे फिरत आहेत. दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना अटक करा. दहशतवादी कुठे आहेत? एक महिना उलटणार आहे. त्यांच्याबद्दल माहिती कुठे आहे? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगाला माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ हे केवळ पंतप्रधान मोदी यांचा यावरून लक्ष विचलित करण्याचा आणि जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली.
#WATCH | Delhi | Congress MP Jairam Ramesh says, " It is going to be a month soon, where are the Pahalgam terrorists? The terrorists have not been caught yet...." https://t.co/mjSTzEGhnk
— ANI (@ANI) May 21, 2025