केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी या बजेटवर सडकून टीका केली असतानाच, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. "काँग्रेस अजूनही कुंभकर्णाच्या झोपेतून जागी झालेली नाही," अशा शब्दांत टोला लगावत शिंदेंनी या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो विकसित भारताच्या भविष्याचा 'ब्लूप्रिंट' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विकासाचा ७.५ टक्क्यांचा वेग आणि महागाईवर नियंत्रण
मध्यमांशी संवाद साधताना सिंधिया म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत भारताने विकासाची जी गती पकडली आहे, तिला हा अर्थसंकल्प अधिक बळकट करेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा विकासदर ७.५ टक्के इतका प्रभावी आहे. विशेष म्हणजे महागाईवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आले असून, गेल्या नऊ महिन्यांत महागाईचा दर अवघा १.७ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च अर्थात कॅपिटल एक्सपेंडिचर २०१४ मधील २ लाख कोटींवरून आता १२ लाख कोटींच्या घरात पोहोचला आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
नव्या युगाची 'ऑरेंज इकॉनॉमी' आणि आधुनिक तंत्रज्ञान
हा अर्थसंकल्प समावेशक असण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. सिंधियांनी स्पष्ट केले की, प्रथमच सरकारने एआय, सेमीकंडक्टर, ऑडिओ-व्हिज्युअल गेमिंग आणि 'ऑरेंज इकॉनॉमी'वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरीकरणाचा वेग पाहता ४००० ई-बसेसची घोषणा आणि ईशान्य भारताला 'लॉजिस्टिक्स हब' बनवण्याची योजना गेमचेंजर ठरेल. पाच नवीन बौद्ध सर्किट्सची घोषणा करून पर्यटनालाही मोठी चालना देण्यात आली आहे.
विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर
"सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प आणून अर्थव्यवस्थेची सुट्टी केली," या विरोधकांच्या आरोपाचा सिंधियांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, "विरोधकांना सुट्टीची चिंता वाटते, पण देशाला नाही. आमचे पंतप्रधान देशासाठी प्रत्येक मिनिट समर्पित करतात. मात्र, काँग्रेसचे नेते अजूनही जुन्याच मानसिकतेत अडकले असून ते वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत."
जागतिक स्तरावर भारताचा डंका
सिंधियांनी 'EFTA' कराराचा उल्लेख करत सांगितले की, जगातील ३० टक्के लोकसंख्येशी संबंधित व्यापारी करार करून भारताने नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. इकोनॉमिक सर्व्हेचे सकारात्मक निकाल आणि आताचा हा प्रगतशील अर्थसंकल्प यामुळे भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे.
Web Summary : Scindia criticized the Congress for opposing the progressive budget, calling it a blueprint for a developed India. He highlighted the 7.5% growth rate, controlled inflation, increased infrastructure spending, and focus on new technologies like AI and the 'Orange Economy.' Scindia emphasized India's global achievements and its path to becoming a world leader.
Web Summary : सिंधिया ने कांग्रेस की प्रगतिशील बजट का विरोध करने के लिए आलोचना की, इसे विकसित भारत का ब्लूप्रिंट बताया। उन्होंने 7.5% विकास दर, नियंत्रित मुद्रास्फीति, बुनियादी ढांचे के खर्च में वृद्धि और एआई और 'ऑरेंज इकोनॉमी' जैसी नई तकनीकों पर ध्यान केंद्रित किया। सिंधिया ने भारत की वैश्विक उपलब्धियों और विश्व गुरु बनने की दिशा में इसके मार्ग पर जोर दिया।