‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:53 IST2025-12-29T12:51:23+5:302025-12-29T12:53:10+5:30
माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.

‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा
नवी दिल्ली : काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि विचारधारा कधीही मरत नाही. आमची शक्ती कमी असू शकते, पण आमचा कणा अजूनही ताठ आहे. आम्ही राज्यघटनेशी कधी तडजोड केली नाही की धर्मनिरपेक्षतेशी ना गरिबांच्या हक्कांची. आम्ही सत्तेत नसू पण कधी सौदा करणार नाही, असे ठाम प्रतिपादन रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केले.
रविवारी काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन होता, या निमित्ताने पक्षाचे मुख्यालय इंदिरा भवन येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना खरगे यांनी काँग्रेसच्या थोर नेत्यांमुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही देश बनला. काँग्रेसने कधी धर्माच्या नावावर मते मागितली नाही की पक्षाने मंदिर-मशिदीच्या नावावर द्वेष पसरवला नाही. काँग्रेसने धर्माला श्रद्धा मानले, असे म्हटले.
माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.
‘काँग्रेस भारताच्या आत्म्याचा आवाज’
काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. हा पक्ष नेहमी कमकुवत, वंचित आणि कष्टकरी व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केले. काँग्रेस पक्षाचा संकल्प हा द्वेष, अन्याय आणि हुकूमशाहीच्या विरोधात सत्य, धैर्य आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्याचा आहे. काँग्रेसने राज्यघटनेचा पाया रचला आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समानतेची मूल्ये बळकट केली असे ते म्हणाले.
थरूर यांचा दिग्विजय सिंह यांना पाठिंबा
आरएसएस-भाजपच्या संघटन शक्तीचे कौतुक करून खळबळ उडवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या विचाराचे आपण समर्थन करत असून संघटन मजबूत झाले पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याचे शशी थरूर यांनी रविवारी स्पष्ट केले.
वर्धापनदिन कार्यक्रमात दिग्विजय सिंह यांच्या शेजारी थरूर बसले होते. त्यांना सिंह यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, संघटन मजबूत झाले पाहिजे यात शंकाच नाही असे ते म्हणाले. थरूर यांनी सोशल मीडियावर, ‘काँग्रेस हा १८८५ च्या पहिल्या अधिवेशनापासून देशाच्या लोकशाही प्रवासाचा व राजकीय उत्क्रांतीचा आधारस्तंभ राहिला आहे’, अशीही पोस्ट प्रसिद्ध केली.