सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 06:12 IST2023-05-17T06:11:59+5:302023-05-17T06:12:46+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री असेल यावर त्यांची सहमती झाली.

सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद
आदेश रावल -
नवी दिल्ली : कर्नाटकबाबत ४८ तासांपासून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसने तयार केला आहे. याबाबत औपचारिक घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे.
काँग्रेसने जो फॉर्म्युला तयार केला आहे त्यानुसार, डी. के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्षही राहतील तसेच, शिवकुमार यांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालयही देण्यात येईल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री असेल यावर त्यांची सहमती झाली.
१८ मे रोजी शपथविधी?
- कर्नाटकातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १८ रोजी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्व त्यादृष्टीने तयारी करत आहे. राहुल गांधी यांचे असे मत आहे की, ज्यांच्याकडे आमदारांचे समर्थन आहे त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे.
- जेव्हा निरीक्षकांना पाठविण्याचा मुद्दा समोर आला तेव्हा जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांना पाठविले. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत.
- आमदारांकडून गोपनीय मतदान करून घेतले तेव्हा सर्वाधिक आमदारांचे समर्थन सिद्धरामय्या यांना असल्याचे दिसून आले. त्यानंतर कर्नाटकचे चित्र स्पष्ट झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या नावांची लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.
दिवसभर नेत्यांचे बैठकांचे सत्र
नवी दिल्लीत मंगळवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. सायंकाळी कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार हे खरगे यांना भेटण्यासाठी दाखल झाले. याचवेळी के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची बैठक १०, जनपथ येथे होत होती.
उपमुख्यमंत्री एकच
मल्लिकार्जुन खरगे यांची अशी इच्छा होती की, त्यांचे निकटवर्तीय माजी प्रदेशाध्यक्ष व दलित नेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. पण, डी. शिवकुमार यांची अशी अट आहे की, ते एकटेच उपमुख्यमंत्री असतील. त्यांची ही मागणी पक्षनेतृत्वाने स्वीकारली आहे.