काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:46 IST2019-07-13T14:44:04+5:302019-07-13T14:46:27+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर पैशांची चणचण

काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेस समोरील संकटं संपताना दिसत नाहीत. राहुल गांधींनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा, कर्नाटकमधील आमदारांचं बंड यानंतर आता पक्ष आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यामुळेच पक्षाकडून विविध विभागांना दिलेल्या निधीत कपात करण्यात आली आहे. 'इंडिया टुडे'नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. पक्षाकडून आता सेवादलाला दर महिन्याला 2 लाखांऐवजी दीड लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय पक्षाकडून महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि युवक काँग्रेसला खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पगारच मिळालेला नाही. केवळ काँग्रेस संघटनेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची अवस्थादेखील बिकट आहे. आधी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममध्ये 55 कर्मचारी होते. मात्र आता 35 कर्मचारी आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेकांनी सोशल मीडिया टीममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या टीममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील उशिरा पगार मिळत आहे. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.