सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:39 IST2025-11-26T17:24:03+5:302025-11-26T17:39:00+5:30
मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले, "सोनिया जी आणि राहुल जी यांच्याशी चर्चा करेन... यानंतर हा विषय सोडवला जाईल.’’

सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेल्या वादाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही दुजोरा दिला आहे. आपण लवकरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढू, असे संकेतही त्यांनी दिले. येत्या ४८ तासांत राहुल गांधी यांच्याशी बोलून, १ डिसेंबरपर्यंत हा वाद संपवू, असे खर्गे यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, १ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले, "सोनिया जी आणि राहुल जी यांच्याशी चर्चा करेन... यानंतर हा विषय सोडवला जाईल.’’ माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 48 तासांत खर्गे आणि राहुल गांधी यांची बैठक निश्चित केली जाईल. यानंतर साधारणपणे शुक्रवारी सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलावले जाईल. कर्नाटकातकाँग्रेस सत्तेवर येऊन अडीट वर्षे पूर्ण झाली आहे. यानंतर, कथित गुप्त करारानुसार, मुख्यमत्रीपद बदलण्याच्या चर्चेला उधान आले आहे. दरम्यान, आपण संपूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहू आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करू, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, डीके शिवकुमार समर्थक आमदारांचा एक गट दिल्लीत तळ ठोकून आहे. अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाची मुदत संपली असून, आता शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, असे या गटाचे म्हणणे आहे. यांनी पक्षश्रेष्ठींना तशी लेखी विनंतीही केली आहे. यातच, रामनगरचे आमदार इकबाल हुसैन यांनी तर "शिवकुमार हेच '२०० टक्के' मुख्यमंत्री होतील," अशी भविष्यवाणीच केली आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनीही पक्षश्रेष्ठींना लवकरात लवकर राज्यातील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर स्थिती लवकरात लवकर स्पष्टता करण्याची मागणी केली असल्याचे सिद्धारमैया गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. यामुळे आता, काँग्रेस अध्यक्ष खर्गे, राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून या कर्नाटक सत्तासंघर्षावर काय तोडगा काढतात? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.