ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:05 IST2025-07-19T06:04:55+5:302025-07-19T06:05:08+5:30
बंगळुरू : तंत्रज्ञानाने मानवाला मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या; परंतु या सुविधा डोळे झाकून विश्वास ठेवून वापरल्या, तर काय होऊ ...

ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
बंगळुरू : तंत्रज्ञानाने मानवाला मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या; परंतु या सुविधा डोळे झाकून विश्वास ठेवून वापरल्या, तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच ‘मेटा’च्या बाबतीत आला. या ऑटो ट्रान्स्लेशन टूलने चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच मृत ठरवले आणि एकच गोंधळ उडाला.
त्याचे झाले असे की, ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे सिद्धरामय्या यांनी अंतिम दर्शन घेतले. मुख्यमंत्री कार्यालयाने यावर एक पोस्ट केली. मूळ पोस्ट कन्नड भाषेत होती. ‘मेटा’ने त्याचा सवयीनुसार इंग्रजी भाषेत अनुवाद केला आणि घोटाळा झाला.
जबाबदारीचे भान ठेवा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
या घडल्या प्रकारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
जोवर अचूक अनुवाद होत नाही, तोवर कन्नड अनुवादाची ही सुविधा निलंबित ठेवायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
अनुवाद नेमका कसा?
मुख्यमंत्र्यांनी बी. सरोजा देवी यांना श्रद्धांजली अर्पण केल्याची कन्नड पोस्ट इंग्रजीत अनुवादित केली जात असताना त्याची थेट वाक्यरचना अशी गोंधळ माजवणारी होती, ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काल निधन झाले.
त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले आणि अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.’ या वाक्यरचनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती.
सुप्रीम कोर्ट ऑफ कर्नाटकने घोळ
शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अनियंत्रित ऑनलाइन घडामोडींमुळे निर्माण झालेल्या धोक्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकारच्या वतीने मेहता यांनी नमूद केले की, ‘सुप्रीम कोर्ट ऑफ कर्नाटक’ नावाने एक बनावट; पण पूर्ण सत्यापित ‘एक्स’ अकाउंट तयार करण्यात आले आहे.
जनतेची दिशाभूल करण्यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा कसा गैरवापर केला जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ सरकारी पातळीवर हे अकाउंट ब्लॉक केल्याविरोधात ‘एक्सने दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी मेहता यांनी हा तर्क मांडला.