Video - हलगर्जीपणाचा कळस! सरकारी शाळेच्या जेवणात पाल; ४३ मुलं आजारी, बेडसाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:26 IST2026-03-11T12:25:26+5:302026-03-11T12:26:19+5:30
शाळेतील दुपारचं जेवण जेवल्यानंतर तब्बल ४३ विद्यार्थी आजारी पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Video - हलगर्जीपणाचा कळस! सरकारी शाळेच्या जेवणात पाल; ४३ मुलं आजारी, बेडसाठी वणवण
तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतून फूड पॉयझनिंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील दुपारचं जेवण जेवल्यानंतर तब्बल ४३ विद्यार्थी आजारी पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांना 'मेडिकल ऑब्झर्व्हेशन'खाली ठेवण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत चिंतेत आहेत. याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
कोइम्बतूर महानगरपालिकेचे (CCMC) आयुक्त एम. शिवगुरु प्रभाकरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत मुलांना देण्यात येणाऱ्या अन्नात पाल पडली होती, ज्यामुळे अन्न दूषित झालं. हे अन्न खाल्यानंतर शाळेतील ३० मुलं आणि १३ मुलींची प्रकृती खालावली. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने शाळेत गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.
#WATCH | Coimbatore, Tamil Nadu: 43 students of a government school in Coimbatore were rushed to the Government Hospital following a suspected case of food poisoning linked to their Noon meal. pic.twitter.com/JIgn0alDzA
— ANI (@ANI) March 10, 2026
४३ विद्यार्थी आजारी
सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. आयुक्तांनी सांगितलं की, सर्व विद्यार्थी आज रात्री ९ वाजेपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. पाच डॉक्टरांचे पथक मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शाळेच्या स्वयंपाकघराची तपासणी केली जाईल आणि चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. इतकंच नाही तर अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लवकरच सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना (सर्क्युलर) पाठवल्या जातील.
मोठी गर्दी झाल्याने बेड अपुरे
घटनेचे नेमके कारण सविस्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालयात आजारी मुलांची मोठी गर्दी झाल्याने बेड अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयाबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली असून ते आपल्या मुलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शाळा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.