DHFLकडून 31 हजार कोटींचा घोटाळा, भाजपाला पार्टीफंड दिल्याचा कोब्रापोस्टचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 09:26 IST2019-01-29T23:07:28+5:302019-01-30T09:26:00+5:30
डीएचएफएल कंपनीद्वारे जवळपास 31 हजार कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

DHFLकडून 31 हजार कोटींचा घोटाळा, भाजपाला पार्टीफंड दिल्याचा कोब्रापोस्टचा दावा
नवी दिल्ली - एक खासगी क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या डीएचएफएल म्हणजेच दीवान हाऊसिंग फायनान्स कोऑपरेशन लिमिटेडवर 31 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शोध पत्रकारिता करणाऱ्या कोब्रा पोस्टने याबाबतचा दावा केला असून डीएचएफएलने बोगस कंपनींना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. मात्र, तो पैसा पुन्हा त्याच कंपनीकडे आला, ज्या कंपन्यांचे मालक डीएचएफएलचे प्रमोटर आहेत.
डीएचएफएल कंपनीद्वारे जवळपास 31 हजार कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा संभाव्य दावा करण्यात येत आहे. सरकारी वेबसाईट आणि सार्वजनिक ठिकाणांहून मिळालेल्या माहितीनुसार या कथित घोटाळ्याचा खुलासा केला आहे. कोब्रापोस्टने दिलेल्या अहवालात, डीएचएफएलसे संलग्नीत कंपन्या, जसे की आरकेडब्लू डेव्हलपर्स, स्किल रियलटर्स, आणि दर्शनी डेव्हलपर्ससारख्या बोगस कंपन्या आहेत. या कंपन्यांनी पैशांची हेराफेरी केली आहे. सन 2014 ते 2017 या कालावधीत या तीन कंपन्यांनी भाजपाला अवैधपणे 20 कोटी रुपयांचा निधीही दिल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, 29 जानेवारी रोजी कोब्रा पोस्टने दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित करून, ‘द एनाटॉमी ऑफ इंडियाज बिगेस्ट फाइनेंशियल स्कॅम नावाने आपला एक अहवाल जारी केला आहे. यावेळी कोब्रा पोस्टचे संपादक अनिरूद्ध बहल, माजी भाजपा नेता यशवंत सिन्हा, पत्रकार जोसी जोसेफ, परंजॉय गुहा ठाकुरता आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकिल प्रशांत भूषण उपस्थित होते.