सागरी किनारा सुरक्षेचा आढावा!
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
सागरीकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ९ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेश प्रमुख यांची बैठक १६ जून रोजी मुंबईत होणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली.

सागरी किनारा सुरक्षेचा आढावा!
नवी दिल्ली : देशातील सागरीकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ९ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेश प्रमुख यांची बैठक १६ जून रोजी मुंबईत होणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली.
या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गोवा, ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशचे मुख्यमंत्री, तसेच दिव, दमण, लक्षद्वीप, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक सहभागी होणार असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हेही बैठकीस हजर राहणार आहेत.
मुंबईत २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सागरीकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्था हा महत्त्वाचा विषय बनला आहे.
त्यामुळे प्रत्येक राज्याची सागरीकिनारा सुरक्षा आजच्या घडीला कितपत सतर्क आहे, तिच्या काय गरजा आहेत, त्यात काय बदल करणे गरजेचे आहे वा ती अत्याधुनिक कशी करता येईल, या बाबींवर या बैठकीत विचार होईल. भारताचा समुद्रकिनारा तब्बल ७५१७ किलोमीटरचा असून, त्यावर १२ मोठी आणि १८७ लहान बंदरे आहेत.
>किनाऱ्यावरील बोटींना विशिष्ट ओळखपत्र
सर्व राज्यांना सागरीकिनारा सुरक्षेसाठी अधिक स्पीड बोटी, जीप, मोटरसायकली देण्यात येणार आहेत, तसेच प्रत्येक सागरीकिनारा पोलीस ठाण्याला संगणक, फर्निचर आणि अन्य साहित्यासाठी सरसकट १0 लाख रुपये दिले जाणार आहेत, असे किरण रिजिजू यांनी सांगितले. संपूर्ण देशात सागरीकिनाऱ्यासाठी समान सुरक्षा व्यवस्था आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक बंदर आणि किनाऱ्यावरील बोटींना विशिष्ट ओळखपत्र दिले जाईल, असे ते म्हणाले.