ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:50 IST2021-08-09T17:47:15+5:302021-08-09T17:50:12+5:30
ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत सुरू झालेला संघर्ष आता थेट त्रिपुरात जाऊन पोहोचला आहे. आता, पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्रिपुरात झालेल्या हल्लावरून, ममता भडकल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी भाजप नेते आणि गृहंमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
ममता यांनी सोमवारी कोलकाता येथे त्रिपुरा येथील घटनेत जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ममता म्हणाल्या, हा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाला. या घटनेमागे त्यांचाच हात आहे. त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह
ममता म्हणाल्या, या हल्ल्यात सुदीप आणि जया जखमी झाले आहेत. ते विद्यार्थी असून त्रिपुराला गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, पोलीस उपस्थित असताना हा हाल्ला झाला. यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधाही देण्यात आली नाही. उलट त्यांनाच अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्यांना एक ग्लास पाणीही दिले गेले नाही.
भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, या हिंसक घटनेनंतरही मी मागे हटणार नाही. जेथे भाजपची सत्ता आहे तेथे टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जात आहेत. यानंतरही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही, अमित शहाच करत आहेत हल्ले -
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय, असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत आणि त्रिपुरा पोलीस फक्त बघत राहिले. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, असे हल्ले करण्याची क्षमता नाही. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्या ताफ्यावर काठ्यांसह काही लोकांनी हल्ला केला होता. आता, हे हल्ला करणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप टीएमसीने केला आहे.