“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:21 IST2025-05-21T13:20:49+5:302025-05-21T13:21:27+5:30
CJI Bhushan Gavai: म्हणूनच आम्ही आमच्या निवृत्त होण्याच्या तारखेची वाट पाहत असतो, असे याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या एका न्यायाधीशाने म्हटले आहे.

“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
CJI Bhushan Gavai: सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच भेटीत स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने न्या. भूषण रा. गवई यांनी एका कार्यक्रमात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावरून राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर या क्षुल्लक मुद्द्याला अधिक महत्त्व देऊ नये, असे सांगत सरन्यायाधीश गवई यांनी या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता सरन्यायाधीश गवई यांनी एका प्रकरणावर सुनावणी करताना पुन्हा एकदा तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
एका बाजूला वक्फ बोर्ड संशोधन कायदा संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातच सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अन्य एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. परंतु, या सुनावणीवेळी दोन्ही न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करताना तिखट शब्दांत भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे टॉपचे पाच न्यायाधीश सुट्टीच्या काळातही येथे बसले आहेत आणि काम करत आहेत, तरीही प्रलंबित खटल्यांसाठी आम्हाला दोषी ठरवले जात आहे, या शब्दांत सरन्यायाधीश गवई यांनी संताप व्यक्त केला.
आम्ही सुट्टीच्या काळातही व्यस्त राहतो
न्यायालयांच्या कामकाजाच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना सरन्यायाधीश गवई म्हणाले की, वकिलांना काम करायचे नाही. दुसरीकडे, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणात सुनावणी स्थगितीची मागणी वकिलांवर संताप व्यक्त केला आणि म्हणाले की, वकिलाने आता सुट्टीनंतरची तारीख मागितली आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. पाच सर्वात टॉपचे न्यायाधीशांनी सुट्टीच्या काळात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला काम करण्यात कोणतीही अडचण नाही. बार काउंसिलच्या सदस्यांना ज्या याचिका हव्या असतील, आम्ही त्या ऐकू. पण आम्हाला बार काउंसिल सदस्यांकडून अशा प्रकारचा प्रतिसाद नको. आम्ही सुट्टीच्या काळातही व्यस्त राहतो, असे न्या. सूर्यकांत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावर युक्तिवाद करताना म्हटले की, न्यायाधीश जेव्हा या याचिकेची सुनावणी करू इच्छितात, तेव्हा आम्ही यायला तयार आहोत. आपल्यापैकी बरेच जण सुट्टीच्या दिवशीही काम करत असतात. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, म्हणूनच आम्ही आमच्या निवृत्तीच्या तारखेची वाट पाहण्याचे हेच कारण आहे.