थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:58 IST2025-10-27T18:57:33+5:302025-10-27T18:58:28+5:30
Chitrakoot Train Accident: मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस चित्रकूट दोन भागात विभागली गेली.

थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Chitrakoot Train Accident: उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मध्यरात्री भीषण रेल्वेअपघात थोडक्यात टळला. मुंबईहून भागलपूरकडे जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस ट्रेन दोन भागांत विभागली गेली. ट्रेनची कपलिंग (डब्यांना जोडणारा भाग) तुटल्याने मागील तीन डबे मुख्य ट्रेनपासून वेगळे झाले. मात्र ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.
ही धक्कादायक घटना मझगाव-टिकरिया रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रात्री 2:54 वाजता घडली. घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली. जवळपास चार तासांच्या प्रयत्नांनंतर डबे पुन्हा जोडण्यात आले आणि सकाळी 7 वाजता ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले की, या घटनेचे मुख्य कारण कपलिंग तुटणे हेच होते. सुमारे 200 ते 250 प्रवासी त्या वेगळ्या झालेल्या डब्यांमध्ये प्रवास करत होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
रेल्वेच्या झाशी विभागाचे डीआरएम यांनी सांगितले की, घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती गठित करण्यात आली आहे. दरम्यान, काही प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.