उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:07 IST2025-11-21T16:04:32+5:302025-11-21T16:07:12+5:30
Chirag Paswan on Bihar Election 2025 : '1 खासदार आणि शुन्य आमदार असलेल्या पक्षावर पंतप्रधान मोदींनी विश्वास टाकला'

उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
Chirag Paswan on Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत NDA तील घटकपक्ष लोजपा (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांनी प्रभावी कामगिरी करत 29 पैकी 19 जागांवर विजय मिळवला. ही कामगिरी त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा मोठा टप्पा मानली जात आहे. निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्यानंतरही चिराग पासवान यांनी कोणत्याही मोठ्या पदाची मागणी न करणे अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले आहे. यावर प्रतिक्रिया देताना चिराग यांनी समाधानी असल्याचे म्हटले.
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही?
मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? असा प्रश्न विचारला असता चिराग पासवान म्हणाले, 'चिराग पासवान आणखी किती लालची होऊ शकतो? उपमुख्यमंत्रिपद मागणे म्हणजे सरळसरळ लालच ठरेल.'
संघर्षाची आठवण...
ते पुढे म्हणाले की, '2021 मधील त्यांचा संघर्ष सर्वांनी पाहिला. माझा पक्ष फोडला, मला घर-परिवारातूनही दूर केले. त्या काळात माझ्या आजूबाजूला एक माणूसही दिसत नव्हता. एखादा कार्यक्रम करायचा तर दहा लोक कुठून आणू हे देखील विचारावे लागे. 2024 मध्ये मी पक्षाचा एकमेव खासदार होतो. एक खासदार असलेल्या पक्षावर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवला आणि मला पाच लोकसभा जागा लढवण्यासाठी दिल्या. या पाचही जागांवर विजय मिळवणे ही त्यांच्या नेतृत्वक्षमता आणि संघटन कौशल्याची जमेची बाजू ठरली.'
VIDEO | Patna, Bihar: Union Minister and Lok Janshakti Party (Ram Vilas) chief Chirag Paswan (@iChiragPaswan), on demanding Deputy CM's post, says, "I don't want to be greedy, happy with what I've got."
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)#Biharpic.twitter.com/LK6zVSIUyG
शून्य आमदार असताना 29 जागा मिळाल्या
चिराग पासवान यांनी विरोधकांनी पसरवलेल्या नरेटिव्हचा उल्लेख करत सांगितले की, 'शून्य आमदार असलेल्या आमच्या पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आणि आम्ही 19 जागा जिंकून आलो. मला त्यांना जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा दिल्याचा आरोप केला जात होता. आणि हे काहीअंशी खरे होते. अनेक पराभूत जागांवर आम्हाला संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत आम्ही 19 जागा जिंकलो.'
'आता आमच्या दोन आमदारांना मंत्रिपद मिळाले. आता यापेक्षा अधिक काय मागू? जर आता देखील मी काही मागणी केली, तर माझ्यापेक्षा मोठा लालची कोणी नसेल. मला मिळालेले यश आणि मान हे सर्व वडील रामविलास पासवान यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले. मला जे मिळाले आहे, ते पुरेसे आहे,' अशी समाधानी प्रतिक्रियी चिराग पासवान यांनी व्यक्त केली.