चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न; भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:09 IST2025-01-04T06:08:20+5:302025-01-04T06:09:15+5:30

तुमच्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, भारताच्या विदेश मंत्रालय प्रवक्त्याने केला कडक शब्दांत निषेध...

China's mischief, attempt to swallow part of Ladakh; India denounces | चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न; भारताने सुनावले

चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न; भारताने सुनावले

नवी दिल्ली : चीनमध्ये असलेल्या होटन प्रीफेक्चर प्रदेशात त्या देशाने दोन नव्या काऊंटींची घोषणा केली असून, त्यातील काही भाग हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील आहे. त्यामुळे चीनच्या या कृतीचा भारताने कठोर शब्दांत विरोध केला आहे. चीनने केलेल्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे.

होटन प्रीफेक्चर भागामध्ये हियान आणि हेकांग या दोन नव्या काऊंटीत भारताचा अविभाज्य भाग असलेल्या लडाखच्या काही प्रदेशाचा समावेश करण्याच्या चीनच्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे भारताने म्हटले आहे. 

पूर्व लडाखमधील सीमातंट्यावर दोन्ही देशांनी एका कराराद्वारे तोडगा काढला असताना आता पुन्हा लडाखमधील भूभागावर डोळा ठेवून चीनने नव्याने कुरापत काढली आहे. त्यामुळे भारत व चीनमधील संबंध सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असे वाटत असतानाच हे नवे प्रकरण उद्भवले आहे. 

युद्धभूमीवर एआयचा करा मर्यादित वापर : चीन
लष्करी सुधारणांवर भर देणाऱ्या चीनने युद्धभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मर्यादित वापर करण्याचा आदेश चीनच्या लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. कोणताही निर्णय घेताना एआय हे पूरक साधन म्हणून वापरावे. मात्र, त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये, असे लष्कराने म्हटले आहे.

डेटा विश्लेषण, नियोजनासाठी एआयचा उपयोग होऊ शकतो, परंतु माणसाच्या कल्पकतेला हे तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. युद्धात मानवी निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता या गोष्टी अपरिहार्य आहेत, असे चीनने म्हटले आहे.

पूर्व लडाखमध्ये डेमचोक, डेपसांग येथे सीमेवरून दोन्ही देशांनी आपापले सैन्य २१ ऑक्टोबर रोजी मागे घेतले. २३ ऑक्टोबरला सीमातंट्यावरील तोडग्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ब्रिक्स परिषदेदरम्यान चर्चा झाली. कैलास मानससरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, नद्यांसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण तसेच दोन्ही देशांतील व्यापार वाढविणे या विषयांवर दोन्ही नेत्यांनी बोलणी केली हाेती.

Web Title: China's mischief, attempt to swallow part of Ladakh; India denounces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.