वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:08 IST2026-01-13T12:07:58+5:302026-01-13T12:08:41+5:30
China Communist Party delegation BJP : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच चीनच्या सत्ताधारी पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात पोहोचले. सन हाययान यांच्या नेतृत्वाखालील या भेटीचे राजकीय महत्त्व आणि भारत-चीन संबंधांवरील परिणाम जाणून घ्या.

वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?
नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील सीमावादानंतर थंडावलेले संबंध आता पुन्हा एकदा राजकीय पातळीवर रुळावर येताना दिसत आहेत. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली. २०२० मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील सत्ताधारी पक्षांमध्ये झालेली ही पहिलीच मोठी औपचारिक भेट आहे. या भेटीवरून काँग्रेसने हा देशद्रोह असल्याची टीका केली आहे. या भेटीनंतर भारत-चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व सीपीसीच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सन हाययान यांनी केले. भाजपचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांनी चिनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. सीपीसीच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सुन हाययान यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत भारतातील चीनचे राजदूत जू फेइहोंग हे देखील उपस्थित होते.
गलवाननंतर भारताने चिनी अॅप्सवर बंदी लादली होती. देशभरात चीनविरोधी वातावरण होते. आजही लोक चीनविरोधात आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी चीनने पाकिस्तानला साथ दिली होती. सर्व सॅटेलाईट, मिसाईल आदी गोष्टी पाकिस्तानच्या दिमतीला लावल्या होत्या. असे असताना भाजपाने चीनच्या शिष्टमंडळाला मुख्यालयात बोलविणे हे अनेकांना खटकणारे आहे. मुळात पाहिले तर भाजप आणि चीनच्या सीपीसीचे नेते २००० सालापासून भेटत आले आहेत. भाजपाने आपले शिष्टमंडळ अनेकदा चीनला पाठविलेले आहे. परंतू २०१७ पासूनच्या डोकलाम वादापासून परिस्थिती थोडी बदलली होती. यानंतर २०२० मध्ये भारतीय हद्दीत घुसून चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. भारताने त्यात जशासतसे प्रत्यूत्तर दिले होते. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनचे त्याहून अधिक सैनिक भारतीय सैन्याने मारले होते. कोरोना व्हायरस पसरविल्याच्या आरोपामुळे चीन आधीच विरोधात जात होता, त्यात हा हल्ला भारतीयांत चीनविरोधात ठिणगी पेटविण्यासाठी पुरेसा ठरला होता. केंद्र सरकारने चिनी कंपन्यांवर कारवाई सुरु केली होती आणि टिकटॉकसह अनेक अॅप्सवर बंदी आणली होती. तसेच देशात बनविलेल्याच वस्तू खरेदी करण्याची व कंपन्यांनाही देशातच वस्तू बनविण्याचे आवाहन करण्यात येत होते.
ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील 'ब्रिक्स' परिषदेदरम्यान खरे भारत- चीनमधील तणाव निवळण्यास सुरुवात झाली होती. यानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणे, थेट विमानसेवा सुरु झाली होती. यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये मोदी चीनमधील एससीओ बैठकीला गेले होते, यानंतर भाजप आणि चीनमधील या राजकीय हालचालींना सुरुवात झाली होती.
काँग्रेस म्हणतेय हा देशद्रोह...
हा देशद्रोह आहे, जो मोदी आणि त्यांचा पक्ष, भाजप करत आहेत. वचन "लाल डोळा" दाखवण्याचे होते, परंतु मोदी चीनसाठी "लाल गालिचा" अंथरत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने या भेटीवर टीका केली आहे. "भाजपा चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत त्यांच्या मुख्यालयात बैठक घेत आहे. दरम्यान, चीन जम्मू आणि काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्याला आपला प्रदेश म्हणून दावा करत आहे. गलवान खोऱ्यात चीनशी लढताना आपले शूर सैनिक शहीद होत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीन पाकिस्तानला पाठिंबा देत आहे.", असे काँग्रेसने म्हटले आहे.