छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:33 IST2025-05-21T19:33:15+5:302025-05-21T19:33:55+5:30
Chhattisgarh Operation Black Forest: छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापुर-दंतेवाडा परिसरात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'मध्ये 27 नक्षलवादी ठार झाले आहेत.

छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
Chhattisgarh Operation Black Forest:छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 27 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. पोलिसांनी बुधवारी (21 मे) दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या चकमकीत टॉप नक्षलवादी कमांडर आणि सीपीआय माओवादी सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचाही खात्मा केला. या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला आणि काही इतर कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाईनंतर गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, या उल्लेखनीय यशाबद्दल आम्हाला सुरक्षा दलांचा अभिमान आहे. आमचे सरकार माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि देशातील नागरिकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
Proud of our forces for this remarkable success. Our Government is committed to eliminating the menace of Maoism and ensuring a life of peace and progress for our people. https://t.co/XlPku5dtnZ
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2025
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्स पोस्टमध्ये म्हटले, छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 27 माओवाद्यांना ठार मारले, ज्यात सीपीआय-माओवादी सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असलेल्या नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचा समावेश आहे. भारताच्या नक्षलवादविरोधी लढाईच्या तीन दशकांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आपल्या सुरक्षा दलांनी सरचिटणीस दर्जाच्या नेत्याला ठार मारले आहे. या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलांचे आणि एजन्सींचे कौतुक करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती अमित शाहांनी दिली.
अशी झाली चकमक
या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, नारायणपूर-विजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या अबुझमद परिसरात नक्षलवाद्यांची केंद्रीय समिती, पॉलिटब्युरोच्या सदस, माड डिव्हिजन आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) चे नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले. आज सुरक्षा दल परिसरात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान आतापर्यंत 27 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत एक डीआरजी जवान शहीद झाला, तर इतर काही जवान जखमी झाले आहेत.