मणिपूर पुन्हा पेटले! २४ तासांतच हिंसाचार; उपमुख्यमंत्री निवडीवरून कुकी समुदाय आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 08:41 IST2026-02-06T08:39:54+5:302026-02-06T08:41:05+5:30
कुकी समुदाय आक्रमक आंदोलनामुळे मणिपूर पुन्हा अशांत झाले असून नवीन सरकार स्थापनेनंतर हिंसाचार सुरु झाला आहे.

मणिपूर पुन्हा पेटले! २४ तासांतच हिंसाचार; उपमुख्यमंत्री निवडीवरून कुकी समुदाय आक्रमक
Manipur Churachandpur Protests: गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राज्यात नवीन सरकारची स्थापना होऊन २४ तास उलटत नाहीत तोच, चुराचांदपूर आणि कांगपोकपी या जिल्ह्यांमध्ये हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. नवीन सरकारमध्ये कुकी समुदायाच्या नेत्यांना स्थान दिल्यामुळे हा वाद उफाळून आला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे.
बुधवारी भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल एक वर्षानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवून नवीन एनडीए सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये संतुलन राखण्यासाठी कुकी समुदायाच्या भाजप आमदार नेमचा किपगेन आणि नागा पीपल्स फ्रंटचे आमदार एल. दिखो यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, हीच नियुक्ती आता वादाचे मुख्य कारण ठरली आहे.
कुकी संघटनांचा विरोध का?
कुकी समुदायातील स्थानिक संघटना आणि आंदोलकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत त्यांच्या स्वतंत्र प्रशासन या प्रमुख मागणीवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत त्यांच्या समुदायाच्या कोणत्याही आमदाराने सरकारमध्ये सामील होऊ नये. कुकी संघटनांनी असा इशारा दिला आहे की, जो आमदार समुदायाचा निर्णय डावलून सरकारमध्ये सामील होईल, तो स्वतःच्या जबाबदारीवर असेल. 'जॉइंट फोरम ऑफ सेवन' या आदिवासी संघटनेने चुराचांदपूरमध्ये १२ तासांच्या पूर्ण बंदची हाक दिली आहे.
हिंसाचार आणि सद्यस्थिती
गुरुवारी संध्याकाळी चुराचांदपूरमधील तुइबोंग बाजार परिसरात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी टायर आणि लाकूड जाळून रस्ते रोखले आणि नवीन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला. या चकमकीत आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही भागांत गोळीबाराच्या घटनाही समोर आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
#WATCH | Manipur | Violence broke out between security forces and the mob in Churachandpur against Nemcha Kipgen and Losii Dikho, taking oath as the Deputy Chief Ministers of Manipur
— ANI (@ANI) February 6, 2026
Police use tear gas to disperse the protestors (05.02) pic.twitter.com/SQI9vpnjho
मे २०२३ मध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांत झालेल्या भीषण जातीय हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. परिस्थिती सुधारत नसल्याने गेल्या वर्षी फेब्रुवारीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता लोकशाही प्रक्रियेने पुन्हा सरकार स्थापन झाले असले तरी, समुदायांमधील अविश्वास अजूनही कायम असल्याचे या आंदोलनावरून स्पष्ट होत आहे. राज्य सरकारने संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. मुख्यमंत्री खेमचंद सिंह यांनी शांततेचे आवाहन केले असून, सर्व समुदायांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, कुकी बहुल भागात अद्यापही तणाव कायम आहे.