सीएम चंद्राबाबूंनी केली भाजपची कोंडी; ज्या निर्णयामुळे तेलंगणात वाद, नेमका तोच निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:51 IST2025-02-18T21:51:25+5:302025-02-18T21:51:48+5:30
Andhra Pradesh Govt Ramadan: तेलंगणा सरकारचा विरोध करणारा भाजप आंध्र प्रदेशात काय करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

सीएम चंद्राबाबूंनी केली भाजपची कोंडी; ज्या निर्णयामुळे तेलंगणात वाद, नेमका तोच निर्णय घेतला
Andhra Pradesh Ramadan leave: तेलंगणानंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजानच्या महिन्यात एक तास लवकर आपले कार्यालय/ऑफिस सोडण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या सरकारने ही घोषणा केली. तेलंगणात या मुद्द्यावरुन भाजपकडून रेवंत रेड्डी (Revant Reddy) सरकारला धारेवर धरले असताना, आंध्रात हा निर्णय घेण्यात आला आहे. नायडू सरकारच्या निर्णयामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
तेलंगणात भाजपने या निर्णयाला तुष्टीकरणाचे राजकारण ठरवून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला, मात्र आंध्र प्रदेशात एनडीएचे सहयोगी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारनेही हाच निर्णय घेतला. यामुळे भाजपची अस्वस्थ झाली आहे. एकीकडे ते तेलंगणात या निर्णयाला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला नाईलाजाने पाठिंबा द्यावा लागणार आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ही सुविधा ?
राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी,शिक्षक,कंत्राटी कामगार,आउटसोर्सिंग कर्मचारी,मंडळ आणि महामंडळाचे कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रमजानच्या महिन्यात आपल्या ऑफिसमधून एक तास लवकर जाता येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने याबाबत अधिकृत आदेशही काढला आहे. तेलंगणात विरोध करणारा भाजप आंध्र प्रदेशात आपल्या मित्रपक्षाबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.