निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 21:22 IST2019-01-07T21:20:54+5:302019-01-07T21:22:25+5:30
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणाऱ्या विधेयकावरून काँग्रेसची टीका

निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय आज मोदी सरकारनं घेतला. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदी सरकावर शरसंधान साधलं. लोकसभा निवडणुकीला 100 दिवस शिल्लक राहिले असताना मोदींना आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांची आठवण झाली. नोकऱ्याच नसताना त्या आरक्षणाचा उपयोग काय, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारला.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं. 'आम्ही अशा निर्णयाचं स्वागतच करू. मात्र मोदीजी नोकऱ्या आहेत कुठे? नोकऱ्या नसताना देण्यात आलेल्या आरक्षणाचा काय उपयोग?,' असा प्रश्न विचारत सरकारला निवडणुकीआधी सवर्णांची आठवण झाली, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला. नोकऱ्या नसताना घेण्यात आलेला आरक्षणाचा निर्णय म्हणजे निव्वळ घोषणाच असेल, असंदेखील ते म्हणाले.
भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे जुमला असल्याचं सिन्हा म्हणाले. 'अशा पद्धतीचं आरक्षण देण्यात अनेक तांत्रिक आणि घटनात्मक अडथळे आहेत. याबद्दलचं विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे या प्रकरणात सरकार लवकरच तोंडघशी पडेल,' असं सिन्हा म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मोदी सरकारकडून उद्याच लोकसभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून हे विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येईल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सरकार अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंदेखील आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.