५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 05:48 IST2025-10-02T05:47:12+5:302025-10-02T05:48:06+5:30
धाराशिव, वाशिम, गडचिरोली, नंदुरबारची प्रतीक्षा संपणार?

५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात ५७ नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत राज्यातील चार जिल्हे आहेत, हे येथे उल्लेखनीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने देशातील १७ महत्त्वाकांक्षी जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशात ५७ केंद्रीय विद्यालय उघडण्याला बुधवारी मंजुरी प्रदान केली. ज्या जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे तेथे २० शाळा, आकांक्षी जिल्ह्यात १४, ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशात पाच आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांत चार शाळा उघडल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार हे चार आकांक्षी जिल्हे आहेत. यातील वाशिममध्ये केव्हीचे बांधकाम सुरू असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले. धाराशिवमध्ये केव्हीसाठी जागा निश्चित करण्यात आली असून, आता राज्य शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव पाठवायला हवा असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांनासुद्धा केव्हीची लॉटरी लागू शकते.