मुजफ्फरपूर - पाकिस्तानसोबत सुरू असलेला लष्करी संघर्ष थांबविण्याबद्दल केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अवघ्या पाच तासांतच सहमती दर्शविली असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात मतदार अधिकार यात्रेच्या अंतर्गत आयोजिलेल्या सभेत त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी इंडिया आघाडीतील द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, राजदचे तेजस्वी यादव त्यांच्यासोबत उपस्थित होते.
राहुल म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जेव्हा टीपेला पोहोचला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून २४ तासांच्या आत युद्ध थांबवा असे सांगितले होते. त्यांचे म्हणणे मोदींनी तात्काळ ऐकले. पंतप्रधानांना २४ तास देण्यात आले होते, पण त्यांनी फक्त पाच तासांतच ट्रम्प यांची सूचना मान्य केली. ही माहिती ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील कॅबिनेट बैठकीत दिली.
प्रियांका गांधी सहप्रवासीबुधवारी राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी या यात्रेदरम्यान मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रस्त्यांवर मोटारसायकलवरून प्रवास केला. यावेळी राहुल गांधींच्या मोटारसायकलवर मागे त्यांची बहीण प्रियांका गांधी बसल्या होत्या.
स्टॅलिन यांची टीकातामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी मतदार अधिकार यात्रेत मुझफ्फरपूर येथे सरकारवर टीका केली. बिहारमध्ये मतदार याद्यांमधून नावे हटवण्याच्या प्रकार दहशतवादापेक्षाही वाईट आहे असेही ते म्हणाले.