कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI ने दाखल केला गुन्हा; ५.६२ लाख भारतीयांचे डेटा चोरी प्रकरण
By देवेश फडके | Updated: January 22, 2021 15:27 IST2021-01-22T15:25:02+5:302021-01-22T15:27:14+5:30
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ब्रिटनची कंपनी असलेल्या कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप या कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI ने दाखल केला गुन्हा; ५.६२ लाख भारतीयांचे डेटा चोरी प्रकरण
नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ब्रिटनची कंपनी असलेल्या कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही सीबीआयकडून कारवाई सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
फेसबुक-कँब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदा पद्धतीने ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा गोळा केला आणि कॅब्रिज अॅनालिटिकाला दिला, असे उत्तर सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिले होते. या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
CBI registers a case against Cambridge Analytica and Global Science Research Ltd for "illegal harvesting of personal data from Facebook users in India." pic.twitter.com/ienWauLlub
— ANI (@ANI) January 22, 2021
मार्च २०१८ च्या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी कँब्रिज अॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरून चोरल्याच्या बातम्या दिल्या होत्या. सुरुवातीला यामध्ये कँब्रिज अॅनालिटिकाने भारतीयांचा डेटा नसल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा घेतल्याची कबुली कंपनीकडून देण्यात आली. या प्रकरणी आता सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.