काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:23 IST2025-11-26T14:23:08+5:302025-11-26T14:23:40+5:30
या केंद्रांवरील मतदारांची नावे चक्क फिल्मी पोस्टर, नायक-नायिका, ड्राय-फ्रुट्स किंवा पर्यटन ब्रोशरवरील नावांसारखी आहेत.

काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
'काजू सिंह', 'बादाम', 'पिस्ता', 'शेरनी बाई', 'टीव्ही', 'अँटेना', 'धर्मेंद्र', 'राजेश खन्ना', 'दिलीप कुमार', 'हेमामालिनी'... ही नावांची यादी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण ही कोणती विनोदी कथा नाही तर, मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात एसआयआर अंतर्गत अद्ययावत करण्यात येत असलेल्या मतदार यादीत ही अनोखी नावे आढळली आहेत, ज्यामुळे मतदार यादी पाहणारे अधिकारीही हैराण झाले आहेत.
आगर मालवा जिल्ह्यातील दोन मतदान केंद्रे ९३ आणि ९४ सध्या या अजब गजब नावांमुळे चर्चेत आहेत. या केंद्रांवरील मतदारांची नावे चक्क फिल्मी पोस्टर, नायक-नायिका, ड्राय-फ्रुट्स किंवा पर्यटन ब्रोशरवरील नावांसारखी आहेत. या अजब नावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण, या अनोख्या नामकरणामागे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेणे तितकेच रंजक आहे.
नावांमागे 'पढी' समुदायाच्या जीवनाची कहाणी
मतदार यादीतील ही अनोखी नावे येथील पारधी समुदायाच्या जीवनशैलीशी जोडलेली आहेत. हा समुदाय पिढ्यानपिढ्या भटकंतीचे जीवन जगत आहे. त्यांच्या या फिरस्त्या जीवनशैलीमुळेच त्यांच्या मुलांची नावे ठेवण्याची पद्धतही अनोखी आहे.
मुलाचा जन्म ज्यावेळी होतो, त्यावेळी जी वस्तू किंवा गोष्ट त्यांच्या आजूबाजूला असते, त्यावरून ते आपल्या मुलाचे नाव ठेवून देतात. कधी तंबूमध्ये सुरू असलेल्या सिनेमातील हिरो-हिरोईनचे नाव, कधी प्रवास करत असलेल्या शहराचे नाव, तर कधी कुटुंबाने खाल्लेल्या स्नॅक्सचे नाव मुलाला दिले जाते.
'बॉलिवूड मला कास्टिंग डायरेक्टर ठेवेल!'
सन २००६ पासून बीएलओ म्हणून कार्यरत असलेले संतोष जैसवाल आपला अनुभव सांगताना हसतात, "माधुरी दीक्षित, जीतेंद्र दीक्षित, प्याज बाई, सरांगपुर बाई, हेमामालिनी... सुरुवातीला ही नावे खूप विचित्र वाटायची, पण आता ती सवयीची झाली आहेत."
संतोष जैसवाल यांनी गमतीशीर अंदाजात सांगितले, "मी इतके फॉर्म भरले आहेत की, आता तर बॉलिवूड मला कास्टिंग डायरेक्टर म्हणून कामाला ठेवेल!" त्यांच्या अन्य सहकारी बीएलओ अधिकारीही "काजू सिंह, सनी देओल, शेरनी बाई, शेर खान..." अशी नावे वाचून सुरुवातीला हा कोणीतरी गंमत करत आहे, असेच वाटले होते; पण आज ही नावे आमच्यासाठी रोजच्या जीवनाचा भाग झाली आहेत, असे सांगतात.
सांगितले नावाचे रहस्य
सामान्य लोकांना जी नावे अनोखी वाटतात, ती या लोकांसाठी मात्र अभिमानाची आणि रोजच्या जीवनाचा हिस्सा आहेत. 'देश प्रेमी' नावाच्या एका मतदाराने मोठ्या अभिमानाने त्याच्या नावामागील कहाणी सांगितली. "माझा जन्म झाला त्या दिवशी वडील सिनेमा बघायला गेले होते. त्यांना चित्रपटातील नायकाचे नाव खूप आवडले, त्याची कथा पसंत पडली आणि बस... त्यांनी माझे नाव 'देश प्रेमी' ठेवून टाकले!"
पढी समाजात 'सोल्जर', 'परदेसी' आणि 'राजकुमार' यांसारखी नावे अतिशय सामान्य आहेत. त्यांच्या या नामकरणामुळे मतदार यादीतील ही नावे केवळ नावे न राहता, या भटक्या समुदायाच्या अनोख्या जीवनाची आणि संस्कृतीची साक्ष देत आहेत.