सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:02 IST2025-07-25T17:02:38+5:302025-07-25T17:02:51+5:30

Rajasthan School Accident:

Can the government bring back our missing children now? Parents' anger after school tragedy | सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

राजस्थानमधील झालावाड येथील पीपलोद गावात शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, शोकाकुल ग्रामस्थांकडून शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त शाळा ही सुमारे ५० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही सरकारकडे विनवण्या करत होतो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता सरकार आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? असा हृदयद्रावक सवाल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक विचारत आहेत.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना संतप्त ग्रामस्थांनी सांगितले की, शाळेची इमारत जीर्ण झाली होती. बऱ्याच काळापासून तिची दुरुस्ती झालेली नव्हती. आधी जी काही दुरुस्ती कर्यात आली ती केवळ वरवरची मलमपट्टी होती. आम्ही शाळेच्या दुरुस्तीबाबत विनवण्या करून करून थकलो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.  त्यांना झालावाड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांसोबत आलेल्या पालकांना अश्रू अनावर होत आहेत. आमच्या मुलांचा काय दोष होता, अशी विचारणा ते करत आहेत. तसेच शासन आणि प्रशासनामधील वाळवी लागलेल्या व्यवस्थेविरोधात लोकांच्या मनातील संताप धुमसत आहे.

दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, ही दुर्घटना प्रार्थनेनंतर घडली. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले असताना सातवीच्या वर्गावरील छप्पर कोसळले. त्यावेळी वर्गात सुमारे ३५ विद्यार्थी होते. विद्यार्थी वर्गात बसले असतानाच अचानक छप्पर कोसळले. या दुर्घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन मदत कार्य सुरू केले होते. 

दरम्यान, ही दुर्घटना म्हणजे सडलेल्या व्यवस्थेला बसलेली चपराक आहे, अशा भाषेत पीडित ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता नुकसान भरपाई मिळाली तरी त्याचा उपयोग काय? आमची मुलं तर गेली, प्रशासनानं वेळीच आमचं ऐकलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता, आता शासन-प्रशासन आमची मुलं परत आणून देऊ शकतं का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.  

Web Title: Can the government bring back our missing children now? Parents' anger after school tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.