पक्षात येताच जितिन यांना मंत्रीपदाचा 'प्रसाद' देण्याच्या तयारीत भाजप, ब्राह्मण चेहऱ्यावर खेळणार मोठा डाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:38 IST2021-06-11T12:37:19+5:302021-06-11T12:38:15+5:30
जितिन प्रसाद यांची भाजपत एन्ट्री करण्याचा टायमिंग असो अथवा भाजप प्रवेशानंतर त्यांनी केलेली वक्तव्ये, यावरून प्रसादांसाठी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात जागा तयार करण्यात आली आहे, असे वाटते.

पक्षात येताच जितिन यांना मंत्रीपदाचा 'प्रसाद' देण्याच्या तयारीत भाजप, ब्राह्मण चेहऱ्यावर खेळणार मोठा डाव!
लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीरवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला गुडबाय करत भाजपत सामील झालेल्या जितिन प्रसाद यांनाही योगी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. (UP cabinet expansion Jitin prasad minister post yogi government)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जितिन प्रसाद यांना विधानपरिषद सदस्य बनवले जाऊ शकते. जुलै महिन्यात पाच जागांसाठी एमएलसी निवडणूक होत आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास, उत्तर प्रदेशात भाजपला निवडणुकीपूर्वी ज्या ब्राह्मण चेहऱ्याची आवश्यकता होती, ती जितिन प्रसाद यांच्या रुपात पूर्ण होईल.
...ब्राह्मण चेहऱ्याचा शोध पूर्ण?
जितिन प्रसाद यांची भाजपत एन्ट्री करण्याचा टायमिंग असो अथवा भाजप प्रवेशानंतर त्यांनी केलेली वक्तव्ये, यावरून प्रसादांसाठी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात जागा तयार करण्यात आली आहे, असे वाटते. कारण सध्या ना लोकसभा निवडणूक आहे, ना उत्तर प्रदेशात एखादी राज्यसभेची जागा खाली आहे. यामुळे जितीन यांची केंद्रात जाण्याची शक्यता फार धुसर आहे.
उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याच बरोबर भाजपला राज्य पातळीवर एका ब्राह्मण चेहऱ्याचीही आवश्यकता होती. त्यामुळे जितिन प्रसाद यांना लवकरच योगींच्या मंत्रिमंडळात सामील केले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
UP Elelction: “भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”
जितिन यांच्या शिवाय एके शर्मा यांनाही जबाबदारी मिळण्याची शक्यता -
जितिन प्रसादांशिवाय एके शर्मा यांचाही योगी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. एके शर्मा आघाडीसंदर्भात दिल्लीत सक्रिय आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी निषाद पक्षाच्या नेत्या आणि अनुप्रिया पटेल यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. अशात एके शर्मा यांना चांगले पद मिळण्याची शक्यता आहे.