सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:08 IST2025-10-01T14:07:58+5:302025-10-01T14:08:46+5:30
विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत असाही प्रश्न लोकांना केला होता.

सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
बिहार विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला वेग आणला आहे. त्यातच बिहार निवडणुकीबाबत एक नवीन सर्व्हे समोर आला आहे. अलीकडच्या ताज्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीत जोरदार टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या एन्ट्रीने विधानसभा निवडणुकीला रंजक बनवले आहे. बिहारमध्ये आता सी व्होटरचा सर्व्हे आला आहे.
या सर्व्हेनुसार, १६ टक्के लोकांनी नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास पसंती दर्शवली आहे तर १० टक्के लोकांनी एलजेपी नेते चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे. सर्वात जास्त म्हणजे ३६ टक्के लोकांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी पसंती दिली आहे. ७ टक्के लोकांनी सम्राट चौधरी यांच्या नावाला पसंती दिली. तेजस्वी यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा नंबर आहे. ज्यांना २३ टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी पसंती दिली आहे. सी व्होटरने सप्टेंबर महिन्यात हे सर्व्हे केले आहेत.
नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती समाधानी?
विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत असा प्रश्न लोकांना केला होता. फेब्रुवारी महिन्यात याबाबत केलेल्या सर्व्हेत ५८ टक्के लोक समाधानी होते तर ३९ टक्के लोक असमाधानी होते. सप्टेंबरच्या सर्व्हेनुसार, ६१ टक्के लोक नितीश कुमार यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसून आले तर ३८ टक्के लोकांनी नितीश कुमार सरकारच्या कामावर असमाधान व्यक्त केले.
दरम्यान, पंतप्रधानपदाबाबत लोकांना विचारले असता, ५२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला तर सर्व्हेनुसार, ४१ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे.