सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:04 IST2025-09-10T09:57:01+5:302025-09-10T10:04:08+5:30

C.P. Radhakrishnan biography in marathi: भारताचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन मूळचे कुठले, त्यांची शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय आहे? वाचा

C. P. Radhakrishnan: The rising graph from RSS volunteer to Vice President | सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

CP Radhakrishnan Vice President: चंद्रपूरम पोंनुसामी राधाकृष्णन (जन्म २० ऑक्टोबर १९५७) हे राजकीय नेते, उद्योजक आणि कृषी व्यावसायिक असून, ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत. याआधी त्यांनी फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या काळात झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्य केले.

राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूमधील तिरुपूर येथे सी. के. पोंनुसामी आणि के. जानकी यांच्या घरी झाला. तरुणपणी ते टेबल टेनिस स्पर्धेत महाविद्यालयीन विजेते होते. त्यांनी तुतिकोरिनमधील व्ही. ओ. चिदंबरम कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवी घेतली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व नंतर जनसंघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द

१९७४ मध्ये ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीत निवडले गेले. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला आणि ते अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय झाले. 

१९९८ मध्ये त्यांनी कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. त्यांनी द्रमुकचे उमेदवार एम. रामनाथन यांचा पराभव केला. तिथून राधाकृष्णन १९९९ मध्ये पुन्हा निवडून आले. मात्र २००४ मध्ये त्यांचा पराभव झाला. २०१४ व २०१९ मध्ये मात्र त्यांना कोइंबतूरमधून निवडणुकात अपयश आले.

२००३ ते २००६ दरम्यान ते भाजप तामिळनाडूचे राज्याध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणून त्यांनी २३ दिवसांची रथयात्रा काढली. या प्रवासात त्यांनी नद्यांची जोडणी, अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि दहशतवादविरोधात प्रचार केला.

२००३ मध्ये त्यांनी राष्ट्रांच्या महासमित भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये संघाच्या स्वयंसेवकावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन करत न्यायालयीन अटक स्वीकारली.

राज्यपालपदाची कारकीर्द (२०२३-२०२५)

१२ फेब्रुवारी फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली. १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

१९ मार्च २०२४ रोजी तामिळसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल यांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.

२७ जुलै २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

२०२५: उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी

१७ ऑगस्ट २०२५ला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी जाहीर केली.

राधाकृष्णन यांचे वैयक्तिक जीवन

२५ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचा विवाह आर. सुमती यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले आहेत.

ते लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य आहेत आणि क्रिकेट, व्हॉलीबॉलची आवड आहे.

उपराष्ट्रपतींची कार्ये

भारताचे उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद आहे.

जेव्हा राष्ट्रपतींचे पद काही कारणांमुळे रिक्त होते, तेव्हा ते राष्ट्रपती म्हणून काम करतात.

विद्यमान राष्ट्रपती अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचे कार्य करण्यास असमर्थ असतात, तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती त्यांचे कार्य पुन्हा सुरू होईपर्यंत त्यांचे कार्य पार पाडतात.

ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. या बाबतीत, त्यांचे अधिकार आणि कार्ये लोकसभा अध्यक्षांसारखीच आहेत.

उपराष्ट्रपती राज्यसभेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्तीदेखील करतात.

उपराष्ट्रपतींचे वेतन

उपराष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते 'सॅलरीज अॅण्ड अलाउन्सेस ऑफ ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट अॅक्ट, १९५३' अंतर्गत निश्चित होते. सध्या राज्यसभेच्या अध्यक्षांना चार लाख रुपये मासिक वेतन मिळते.

Web Title: C. P. Radhakrishnan: The rising graph from RSS volunteer to Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.