'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:35 IST2025-10-29T09:34:26+5:302025-10-29T09:35:12+5:30
एका खासगी स्लीपर बसला अचानक भीषण आग लागली, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील मनोहरपूर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. २८ ऑक्टोबर रोजी एका खासगी स्लीपर बसला अचानक भीषण आग लागली, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नसीम मियां (५०) आणि त्यांची मुलगी सनम (२०) अशी या दोघांची नावं आहेत. कुटुंबीयांसमोरच या दोघांनी जीव गमावला.
मजुरांनी भरलेली बस विजेच्या तारेच्या संपर्कात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बसमध्ये मनोहरपूरमधील एका वीटभट्टीवर काम करण्यासाठी निघालेल्या ५० हून अधिक कामगारांचा समावेश होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर १० जण भाजले. जयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजपाल सिंह यांनी सांगितलं की, बस कच्च्या रस्त्यावरून जात असताना, छतावर ठेवलेले सामानाचा हाय-टेन्शन लाईनला स्पर्श झाल्याने बसने पेट घेतला.
नसीम मियाँ गेल्या तीन वर्षांपासून जयपूरमधील मनोहरपूर येथील एका वीटभट्टीवर कामगार होते. त्यांची पत्नी नजमा, मुलं राजा आणि फैजान, मुली सनम आणि सेहरून देखील बसमध्ये होत्या. अपघाताच्या वेळी संपूर्ण कुटुंब सोमवारी संध्याकाळी राजस्थानला बसमधून निघाले होते. नसीमच्या गावातील शेरपूर कलान आणि आसपासच्या भागातील अनेक कुटुंबं मजुरीच्या कामासाठी राजस्थानला येतात आणि जातात.
पूर्णपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितलं की, अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेल्या नसीमच्या पत्नी आणि मुलाने त्यांचे वडील आणि बहिणीला आगीत जळताना पाहिलं. पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रशासनाने जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. राजस्थान पोलिसांनी तपास सुरू केला आहे, तर पिलीभीतमधील संपूर्ण गाव शोकाकुल आहे.