आंध्र प्रदेशात बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:23 IST2025-11-06T13:22:17+5:302025-11-06T13:23:07+5:30
काही दिवसांपूर्वीच राज्यात बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

आंध्र प्रदेशात बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे जीव
Andhra Pradesh: गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेली बस अपघातांची मालिका काही केल्या थांबेना. आता ताजी घटना आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम जिल्ह्यात गुरुवारी (दि.6) सकाळी घडली. ओडिशाकडे जाणाऱ्या सरकारी बसने अचानक पेट घेतला, पण चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेत बस जळून खाक झाली असली तरी, एकाही प्रवाशाला इजा झाली नाही.
घटना कशी घडली?
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनकी घाट रस्ता ओलांडत असताना आरटीसी बसच्या इंजिनमधून अचानक धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. बस डोंगर चढत असताना ती अचानक थांबली. चालकाने तत्काळ इंजिन तपासले आणि आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणातच बसला पूर्णपणे आग लागली. चालकाच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
यानंतर अग्निशमन दलाने काही मिनिटांतच आग विझवली आणि परिसर सुरक्षित करण्यात आला. चालकाने सतर्कता दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवासी आणि प्रशासनाकडून चालकाचे कौतुक होत आहे.
यापूर्वी बस अपघातात अनेकांचा मृत्यू
आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यांपासून बस अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कुरनूल जिल्ह्यात बसमध्ये लागलेल्या आगीत 20 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा पार्श्वभूमीवर पार्वतीपुरममधील ही घटना पुन्हा एकदा राज्यातील बस सुरक्षिततेवरील प्रश्न उभे करते.