आंध्र प्रदेशात बस आणि डंपरची भीषण धडक; अपघातात ८ जणांचा होरपळून अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:57 IST2026-03-26T08:56:39+5:302026-03-26T08:57:59+5:30
आंध्र प्रदेशातील मार्कापुरममध्ये बस आणि डंपरच्या भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. १८ जण जखमी असून बचावकार्य सुरू आहे.

आंध्र प्रदेशात बस आणि डंपरची भीषण धडक; अपघातात ८ जणांचा होरपळून अंत
आंध्र प्रदेशातील मार्कापुरमजवळ एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला असून, यात किमान ८ प्रवाशांचा जागीच जिवंत जळून मृत्यू झाला आहे. रायवरम येथील एका स्लॅब क्वारीजवळ भरधाव बस आणि खडीने भरलेल्या डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर काही सेकंदातच बसला भीषण आग लागली, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
बसचा झाला कोळसा!
समोर आलेल्या माहितीनुसार, ही खाजगी बस अत्यंत वेगात होती. समोरून येणाऱ्या डंपरला बसने इतकी जोरात धडक दिली की, इंधन टाकी फुटून बसने तत्काळ पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. बसमध्ये अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, आत अडकलेल्या ८ जणांचा कोळसा झाला आहे.
In a horrific incident in Andhra Pradesh, a bus caught fire following a road accident, leading to the deaths of at least 10 passengers who were burned alive. The mishap occurred late last night on a busy highway, where the vehicle reportedly collided with another before flames… pic.twitter.com/JE9AkFDOTK
— RB. (@rahul4bisht) March 26, 2026
१८ प्रवासी गंभीर, बचावकार्य सुरू
मार्कापुरमचे पोलीस उपअधीक्षक नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १८ जखमी प्रवाशांना आगीतून सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण काही मृतदेह अजूनही जळालेल्या बसच्या आत अडकलेले असण्याची शक्यता आहे. मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जळाले आहेत की, त्यांची ओळख पटवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने मदत कार्य राबवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.