बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:03 IST2025-10-08T13:59:42+5:302025-10-08T14:03:04+5:30
इन्फिनिटी इन्फोवेचा आयपीओ (IPO) ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत खुला होता. यानंतर बुधवारी ८ ऑक्टोबरला कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग झाली...

बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
शेअर बाजारातील एका छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एकाच दिवसात मालामाल करत शेअर बाजारात धमाकेदार सुरुवात केली आहे. या कंपनीचे नाव आहे इन्फिनिटी इंफोवे. या कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे. आयपीओमध्ये कंपनीचा शेअर १५५ रुपयांवर होता. लिस्टिंगनंतर हा शेअर ३०९.२० रुपयांवर पोहोचला. इन्फिनिटी इन्फोवेचा आयपीओ (IPO) ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत खुला होता. यानंतर बुधवारी ८ ऑक्टोबरला कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग झाली.
इन्फिनिटी इन्फोवेचे शेअर्स ९० टक्क्यांच्या प्रीमियमसह २९४.५० रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंगनंतर लगेचच, शेअरने आणखी ५ टक्क्यांची उसळी घेत ३०९.२० रुपयांचा उच्चांक गाठला. यामुळे, इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १०० टक्क्यांनी वधारले. या तेजीमुळे कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) १६८ कोटी रुपयांच्याही पुढे गेले आहे.
कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. हा इश्यू एकूण २७७.२४ पटीने सबस्क्राइब झाला. यात किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांचा कोटा ३०३.३५ पटीने, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) कोटा ५४८.९९ पटीने सबस्क्राइब झाला.
२००८ साली सुरू झालेली इन्फिनिटी इन्फोवे, 'SaaS' क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. कस्टमाइज्ड क्लाउड-आधारित एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) सोल्युशन्स पुरवण्यात कंपनीचे विशेष स्थान आहे. शिक्षण, उत्पादन, रिटेल, बांधकाम आणि एचआर व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांना ती सेवा पुरवते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)