बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:52 IST2025-11-13T13:49:34+5:302025-11-13T13:52:00+5:30
Delhi Bomb Blast: दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाल किल्ला स्फोटाच्या आधीपासूनच धरपकड सुरू होती. आता त्याला वेग आला आहे. यातूनच एका वसतिगृहातील खोलीलाच अड्डा बनवले गेल्याचे समोर आले आहे.

बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
डॉक्टरांसाठीच्या वसतिगृहातील एक खोली. तिथे अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहून कुणालाही वाटलं नसेल की, इथे काय कट शिजू लागला आहे. अल फलाह विद्यापीठात असलेल्या वसतिगृहातील एक खोली दहशतवादी संघटनांशी जोडलेल्या गेलेल्यांचा अड्डा बनला. डॉक्टर टेरर मॉड्युलचं केंद्र होतं खोली क्रमांक १३. १७ क्रमांकाच्या इमारतीतील याच खोलीत घातपात घडवण्याच्या बैठका सुरू होत्या.
हरयाणातील फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठ सध्या चर्चेच्या केंद्र स्थानी आहे. डॉ. उमर नबीने लाल किल्ल्याजवळील रस्त्यावर कारमध्ये स्फोट घडवल्यानंतर या विद्यापीठाचे नाव प्रकाशझोतात आले. डॉ. उमर नबी हा अल फलाह विद्यापीठातच नोकरीला होता.
बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे २९०० किलो आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली. ही स्फोटके सापडली डॉ. मुजम्मिल शकील हा भाड्याने राहत असलेल्या घरात. मुजम्मिलही अल फलाह विद्यापीठात नोकरीला आहे. सध्या अटकेत असलेली डॉ. शाहीन शाहीद, जिच्यावर भारतात पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मदच्या विंगची जबाबदारी होती. तीही याच विद्यापीठात कार्यरत होती.
मुजम्मिल आणि शाहीन अटकेत आहे, तर उमरचा कार स्फोटातच मृत्यू झाला. याच विद्यापीठात कार्यरत असलेला निसार उल हसन मूळचा काश्मीरचा. सध्या तो फरार आहे.
वसतिगृहातील खोली क्रमांक १३ बनला दहशतवाद्यांचा अड्डा
वसतिगृहातील १३ क्रमांकाच्या खोलीमध्ये डॉ. मुजम्मिल राहत होता. तो मूळचा काश्मीरमधील पुलवामाचा आहे. याच खोलीत तो इतर कट्टरपंथीय डॉक्टरांना भेटत होत. देशात घातपात घडवण्यासंदर्भात चर्चा करायचा, असा आरोप आहे.
आरोपींनी बॉम्ब बनवण्याठी लागणारी रसायने आधी लॅबमध्ये कशी आणायची आणि नंतर ती खोलीपर्यंत कशी न्यायची, याबद्दलही चर्चा केली होती. ही खोली पोलिसांनी सीलबंद केली आहे. याच खोलीत इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस, पेन ड्राईव्ह मिळाले आहेत. खोलीमध्ये रसायने आणि स्फोटके ठेवली गेली होती, याचेही पुरावे मिळाले आहेत.
हीच रसायने आणि अम्युनियम नायट्रेट एकत्र करून बॉम्ब तयार केले गेले असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. सूत्रांनी सांगितले की, विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने धौज आणि टागा गावात घेऊन जाण्यास डॉ. उमर आणि डॉ. शाहीन यांनी मदत केल्याचा आरोप आहे.