Budget Session : राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ; दिवसभरात काय झालं..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:49 IST2023-03-20T18:49:20+5:302023-03-20T18:49:46+5:30
Budget Session : सत्ताधारी राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहेत, तर विरोधक अदानीप्रकरणी जीपीसीची मागणी करत आहेत.

Budget Session : राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ; दिवसभरात काय झालं..?
Parliament Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवसही गदारोळाचा ठरला. राहुल गांधींच्या विदेशातील वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि अदानी प्रकरणात जेपीसीच्या मागणीवरुन विरोधक एकमेकांसमोर आले. त्यामुळे पहिल्या आठवड्यात संसदेत कोणतेही कामकाज झाले नाही. राहुल गांधींनी माफी मागावी, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले. यापूर्वीही अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे.
यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर संसद ठप्प केल्याचा आणि अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरुन लक्ष हटवल्याचा आरोप केला. काँग्रेस, द्रमुक, आरजेडी, सीपीआयएम, सीपीआय, एनसीपी, जेडीयू, आप आणि शिवसेना या विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी संसद भवन संकुलातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक झाली.
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी पंतप्रधानांच्या सूचनेशिवाय भाजपमध्ये काहीही होत नसल्याचा दावा केला. त्यांनी आरोप केला, सरकार जेपीसीपासून दूर का पळत आहे आणि लक्ष वळवण्याचे मार्ग शोधत आहे. जेपीसी स्थापन होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, आमचा संघर्ष सुरुच राहणार', असे ते म्हणाले.
त्याचवेळी लोकसभेत भाजपने राहुल गांधी माफी मागा अशा घोषणा दिल्या. लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहात बोलण्याची परवानगी मागितली आहे, पण भाजपचे म्हणणे आहे की राहुल गांधींनी आधी माफी मागावी, तसे झाले तर त्यांना सभागृहात बोलू द्यावे.