बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. तेव्हापासून त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होतं. ते पूर्णम यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तानने आता बीएसएफ जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परत आले आहेत. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी "आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णमजी आले आहेत" असं म्हटलं आहे.
"२२ दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली होती. पूर्णम यांनी सांगितलं की. काळजी करू नका, मी पूर्णपणे ठीक आहे, माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे. मी जेवल्यानंतर ३ वाजता तुम्हाला फोन करेन. जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन."
"आम्ही आशा सोडून दिली होती"
"मी खूप आनंदी आहे. आम्ही आशा सोडून दिली होती. किती दिवस झाले. युद्धविराम झाला आणि ते तीन दिवसांत परत आलेत. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानू इच्छिते कारण त्या मला तीन-चार दिवसांपासून सतत फोन करत होत्या. यानंतर मला कल्याण सर आणि अध्यक्ष विजय मिश्रा सर यांचाही फोन आला. सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. ममताजींनी माझ्या मेडिकल ट्रीटमेंटबद्दल विचारलं. मी सर्वांचे हात जोडून आभार मानू इच्छिते. मला सांगण्यात आलं होतं की, तुमचे पती येतील तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. जर मला बोलावलं तर मी नक्कीच जाईन" असं रजनी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. "आमचे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका झाल्याचं समजल्यावर मला खूप आनंद झाला. मी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते आणि त्यांच्या पत्नीशी तीन वेळा बोलले. आजही मी त्यांना फोन केला. माझ्या भावासारख्या असलेल्या देशाच्या जवानाला, त्यांच्या पत्नी रजनी शॉला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वत्र मिठाई वाटली जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, "आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि बीएसएफ अधिकाऱ्यांचे आभार मानतो. गेले २ आठवडे आमची रात्रीची झोप उडाली होती. आम्हाला त्यांच्या तब्येतीबद्दल सतत काळजी वाटत होती. आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. अखेर आमची प्रार्थना फळाला आली आहेत."