"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:59 IST2025-05-12T19:57:47+5:302025-05-12T19:59:16+5:30
शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले.

"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
पाटणा विमानतळावर सोमवारी शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले. जम्मू आणि काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्तियाज शहीद झाले.
"मला माझ्या वडिलांचा अभिमान"
"मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. देशासाठी आपलं बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मी सलाम करतो" असं माध्यमांशी बोलताना इमरानने म्हटलं आहे. त्याने सांगितलं की, तो त्याच्या वडिलांशी १० मे रोजी सकाळी ५:३० वाजता शेवटचा बोलला होता. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. त्याच संध्याकाळी ते शहीद झाल्याची माहिती मिळाली.
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
"पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं"
मोहम्मद इम्तियाज यांचा मुलगा इमरानने सरकारकडे पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची मागणी केली. "आपल्या सरकारने असं चोख प्रत्युत्तर द्यायला पाहिजे की दुसऱ्या कोणत्याही मुलाला त्याचे वडील गमवावे लागू नयेत. आता पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचं आहे" असंही इमरानने म्हटलं आहे.
पाटणा विमानतळावर देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर
पाटणा विमानतळावर शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि श्रद्धांजली समारंभही आयोजित करण्यात आला. यानंतर पार्थिव सारण जिल्ह्यातील नारायणपूर गावात नेण्यात आलं. श्रद्धांजली वाहण्यासाठी विमानतळावर अनेक राजकारणी आणि अधिकारी उपस्थित होते. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, दिलीप जयस्वाल, ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
"शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
तेजस्वी यादव म्हणाले की, "शहीद इम्तियाज यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना आपला जीव गमावला आहे. आज आपण सुरक्षित आहोत कारण असे शूर जवान आपलं रक्षण करतात. देश त्यांचं बलिदान कधीही विसरणार नाही." ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी शहीद मोहम्मद इम्तियाज यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. आपल्या जवानांनी त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे असं म्हटलं.