चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:34 IST2025-12-31T20:32:16+5:302025-12-31T20:34:42+5:30
Assam Crime News: आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एक भयानक घटना घडली आहे. येथे चेटकीण असल्याच्या संशयामधून जमावाने एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केली. तसेच या घटनेनंतर त्यांच्या घरालाही आग लावली.

चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना
आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एक भयानक घटना घडली आहे. येथे चेटकीण असल्याच्या संशयामधून जमावाने एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केली. तसेच या घटनेनंतर त्यांच्या घरालाही आग लावली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पतीचं नाव गार्दी बिरुआ आणि पत्नीचं नाव मीरा बिरुआ असं आहे. काही लोकांनी या दाम्पत्यावर जादुटोणा आणि चेटकीण असल्ता आरोपा केला. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपींनी या दाम्पत्याच्या घरालाही आग लावली.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. कार्बी आंगलोंग स्वायत्त जिल्हा परिषदेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.