भाऊ परतला! ७ वर्षांपासून पाकिस्तानात होता कैद; बहिणीने ५ वर्षे झिजवलेले मंत्रालयाचे उंबरठे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:20 IST2026-02-02T20:17:28+5:302026-02-02T20:20:17+5:30
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचा रहिवासी असलेला प्रसन्नजीत रंगारी अखेर ७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून भारतात परतला आहे.

भाऊ परतला! ७ वर्षांपासून पाकिस्तानात होता कैद; बहिणीने ५ वर्षे झिजवलेले मंत्रालयाचे उंबरठे
"दादा, तू घरी ये..." हा टाहो आहे त्या बहिणीचा जिने गेल्या ५ वर्षांपासून आपल्या भावाला शत्रूराष्ट्राच्या तावडीतून सोडवण्यासाठी आकाशपाताळ एक केले होते. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचा रहिवासी असलेला प्रसन्नजीत रंगारी अखेर ७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून भारतात परतला आहे. ज्या भावाला घरच्यांनी मृत मानले होते, तो जिवंत असल्याचे कळताच बहिणीने मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले आणि अखेर ३१ जानेवारीला हा अभिमन्यू मायदेशात परतला.
वडिलांच्या निधनाच्या दिवशीच आले होते पत्र!
प्रसन्नजीत हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. वडिलांनी कर्ज काढून त्याला जबलपूरमधून बी. फार्मसीचे शिक्षण दिले होते. मात्र, २०११ मध्ये नोंदणी झाल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि तो अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी खूप शोध घेतला, पण तो न सापडल्याने सर्वांनी आशा सोडली होती. दरम्यान, १ ऑक्टोबर २०१९ रोजी त्याला पाकिस्तानच्या बाटापूरमधून ताब्यात घेण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी प्रसन्नजीतच्या व्हेरिफिकेशनची कागदपत्रे घरी पोहोचली, त्याच दिवशी त्याच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या मुलाला डोळे भरून पाहण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिली.
खोट्या नावाने पाकिस्तानात होता कैद
प्रसन्नजीत पाकिस्तानच्या तुरुंगात ‘सुनील अदे’ या नावाने बंद होता. त्याच्यावर कोणतेही गंभीर आरोप सिद्ध झाले नव्हते, तरीही त्याला ७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. ३१ जानेवारी रोजी अटारी-वाघा बॉर्डरवर बीएसएफच्या स्वाधीन करण्यात आलेल्या ७ भारतीय कैद्यांमध्ये प्रसन्नजीतचा समावेश होता. अमृतसरच्या पोलीस ठाण्यातून जेव्हा संघमित्राचा आपल्या भावाशी फोनवर संवाद झाला, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले. "माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत, तूच मला न्यायला ये," असे भावाने म्हणताच संघमित्राने तातडीने त्याला आणण्याची सोय केली.
संघमित्राची ५ वर्षांची झुंज यशस्वी
प्रसन्नजीतची बहीण संघमित्रा गेल्या ५ वर्षांपासून भावाच्या सुटकेसाठी लढा देत होती. त्याने तुरुंगातून लिहिलेली पत्रे आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी तिने अनेक नेत्यांचे दरवाजे ठोठावले. "वडील आज आपल्यात नाहीत, पण आईला तिचा मुलगा परत मिळणार याचे समाधान आहे," अशा भावना तिने व्यक्त केल्या. सध्या प्रसन्नजीत अमृतसरच्या रेड क्रॉस भवनमध्ये सुरक्षित असून, त्याचे मेहुणे त्याला आणण्यासाठी रवाना झाले आहेत.