ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोचली असून सर्वांचे लक्ष पुढील आठवड्यात जाहीर होणा-या निकालांकडे लागलेले असतानाच निवडणूक आयोगाने १२ मे च्या सायंकाळपासून एक्झिट पोल ( मतदानानंतरचे सर्वेक्षण) प्रसारित करण्याची परवानगी असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवार, १२ मे रोजी निवडणुकीचा शेवटचा, नववा टप्पा पार पडत असून संध्याकाळी मतदान समाप्त झाल्यावर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल प्रसारित होऊ शकतात, असे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी आयोगाने १६ मे नंतर एक्झिट पोल प्रसारित होऊ शकतात असे सांगितले होते, मात्र काही वेळातच त्यात सुधारणा करत ही तारीख १२ मे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अनेक टप्प्यांत घेतल्या जाणा-या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू होण्याच्या आधीच्या काळापासून एक्झिट पोलवरील बंदी सुरू होते व मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यावर अर्ध्या तासानंतर ही बंदी संपते.