अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:45 IST2024-12-19T11:42:31+5:302024-12-19T11:45:07+5:30
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे.

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'
Arvind Kejriwal letter to Nitish Kumar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाने विरोधकांना भाजपला घेरण्यासाठी मुद्दा मिळाला असून, देशभरात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या विधानावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यानंतर आपचे नेते केजरीवाल यांनी थेट एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना पत्रातून दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, " मी तुम्हाला हे पत्र अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात लिहित आहे. तो केवळ संविधानाचाच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाशीही संबंधित आहे."
"देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. त्यांचं असं म्हणणं की, 'आंबेडकर... आंबेडकर बोलणं आजकाल फॅशन झाली आहे.' हा फक्त अवमानजनक नाही, तर भाजपचा बाबासाहेब आणि संविधानाकडे बघण्याचा दृष्टीकोणही उघड करते", केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे.
भाजपने असं म्हणण्याचं धाडस कसं केलं?
नितीश कुमारांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी पुढे म्हटलं आहे की, "बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज् ने सन्मानित केले होते. ज्यांनी भारताच्या संविधान लिहिले आणि समाजातील सर्वात वंचित घटकांना अधिकार मिळवून देण्याचे स्वप्न बघितले, त्यांच्याबद्दल असं म्हणण्याचं धाडस भाजपने कसं केलं?"
"यामुळे देशभरात कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विधान केल्यानंतर अमित शाह यांनी माफी मागण्याऐवजी त्यांचे विधान योग्य ठरवले आहे. पंतप्रधानांनी जाहीरपणे अमित शाह यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्याने जखमेवर मीठ लावण्याचेच काम केले आहे. लोकांना वाटू लागलं आहे की, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आता भाजपचे समर्थन करू शकत नाही", असे म्हणत अरविंद केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना दिला आहे.
बीजेपी ने संसद में बाबा साहेब का अपमान किया है। लोगों को लगता है कि बाबा साहेब को चाहने वाले बीजेपी का समर्थन नहीं कर सकते। आप भी इस पर विचार करें।
श्री नीतीश कुमार जी को मेरा पत्र। pic.twitter.com/YLd7lXrqmn— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 19, 2024
सखोल विचार करा -अरविंद केजरीवाल
पत्राच्या अखेरीस अरविंद केजरीवालांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब फक्त एक नेता नाहीत, तर आपल्या देशाचा आत्मा आहेत. भाजपच्या या विधानानंतर लोकांना असं वाटतं आहे की, तुम्ही या मुद्द्यावर सखोल विचार करावा."