राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:45 IST2025-11-05T13:44:32+5:302025-11-05T13:45:07+5:30
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ.

राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर 'मतदान चोरी' आणि गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी 'H' फाईल्स सादर करताना एक धक्कादायक उदाहरण दिले, ज्यामध्ये एकाच व्यक्तीच्या फोटोचा वापर २२ वेगवेगळ्या नावांनी मतदान करण्यासाठी करण्यात आला होता आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून ब्राझीलियन मॉडेल असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींचा नेमका आरोप काय?
२२ नावे, एक फोटो: राहुल गांधींच्या दाव्यानुसार, हरियाणातील राई विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या यादीत एकाच फोटोचा वापर सीमा, स्वीटी, सरस्वती अशा वेगवेगळ्या २२ नावांनी करण्यात आला आहे.
मतदार कोण आहे?: राहुल गांधींनी दावा केला की, हा फोटो एका ब्राझीलियन मॉडेलचा आहे. काँग्रेस केरळच्या ट्विटर हँडलवर (आता X) पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार, या नागरिकाचे नाव मॅथ्यूज फेरोरो आहे. या मॅथ्यूज फेरोरो यांनी स्वीटीपासून सरस्वतीपर्यंतच्या २२ नावांनी हरियाणात मतदान केले, असा राहुल गांधींचा आरोप आहे.
परंतू, राहुल गांधींनी ज्या मॉडेलचा फोटो वापरला तो मॅथ्यूज फेरोरो नावाच्या प्रसिद्ध फोटोग्राफरने क्लिक केलेला आहे. मात्र, राहुल गांधींनी त्या फोटोचा वापर करत मतदान चोरीचा दावा केल्याचे समोर येत आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. असे असले तरी हा फोटो २२ वेळा मतदार यादीत वापरण्यात आला आहे, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. राहुल यांनी तिच्याऐवजी तिचा फोटो काढणाऱ्या व्यक्तीचे नाव घेतले आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्न: "निवडणूक आयोगाला हरियाणा निवडणुकीत झालेली संपूर्ण मतदान चोरी सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावा हवा आहे का?" असा प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
राजकीय खळबळ:
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी राहुल गांधींनी हा 'हायड्रोजन बॉम्ब' फोडल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार मतदार यादीतील त्रुटी आणि गैरव्यवहारावर थेट बोट ठेवत असल्याने, विरोधी पक्षांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे, तर सत्ताधारी पक्षाने या आरोपांचा खंडन केले आहे.