बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 15:54 IST2025-11-23T15:54:15+5:302025-11-23T15:54:28+5:30
बहरीनहून हैदराबादला येणाऱ्या 'गल्फ एअर'च्या 'जीफ-२७४' या विमानाला हवेतच मुंबईकडे वळवावे लागले.

बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने काल रात्री मोठी खळबळ उडाली. या धमकीमुळे तातडीने बहरीनहून हैदराबादला येणाऱ्या 'गल्फ एअर'च्या 'जीफ-२७४' या विमानाला हवेतच मुंबईकडे वळवावे लागले. सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाल्याने विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'गल्फ एअर'च्या विमानाने २२ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३३ वाजता बहरीनमधून उड्डाण केले होते. परंतु, हैदराबाद विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची सूचना देणारा ई-मेल कस्टमर सर्व्हिस विभागाला प्राप्त झाला. या गंभीर धमकीमुळे विमानाचे नियंत्रण विभागाने कोणताही धोका न पत्करता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाला तातडीने मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेतला. हे विमान आज सकाळी ११:३१ वाजता मुंबईत सुरक्षितपणे उतरले.
'अराईव्हल' परिसरात बॉम्बस्फोट होणार!
धमकी देणारा ई-मेल शुक्रवारी विमानतळ प्रशासनाला मिळाला. यात स्पष्टपणे नमूद केले होते की, विमानतळाच्या 'अराईव्हल' परिसरात बॉम्बस्फोट होईल. या ई-मेलमध्ये तातडीने तपासणी करून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचनाही करण्यात आली होती.
धमकी मिळताच विमानतळावर तत्काळ बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि स्निफर डॉग्सच्या टीमला पाचारण करण्यात आले. तातडीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अनेक तासांच्या तपासणीनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट केले. कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही.
दोन दिवसांत दुसरी धमकी
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच, मंगळवारी (२१ नोव्हेंबर), देखील याच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता, जो तपासानंतर खोटा ठरला. दोन दिवसांत अशा दोन घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
सध्या पोलीस या धमकीच्या ई-मेलची कसून चौकशी करत आहेत. हा ई-मेल कोणी पाठवला आणि यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. अशा खोट्या धमक्या वारंवार येत असल्या तरी, राष्ट्रीय सुरक्षा संस्था कोणतीही हयगय न करता अत्यंत गंभीरतेने प्रत्येक धमकीची चौकशी करत आहेत.