इंडिगोच्या विमानात बॉम्ब? कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:42 IST2026-01-30T15:42:15+5:302026-01-30T15:42:55+5:30
कुवेतहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्या विमानात शुक्रवारी पहाटे बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली.

इंडिगोच्या विमानात बॉम्ब? कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
कुवेतहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्याविमानात शुक्रवारी पहाटे बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर वैमानिकाने तत्काळ सावधगिरी बाळगत विमानाची दिशा बदलली आणि अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. विमानातील सर्व १८० प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
चिठ्ठी सापडली अन् प्रवाशांचा थरकाप उडाला!
इंडिगोची ही फ्लाईट कुवेतहून दिल्लीकडे येत होती. विमान हवेत असतानाच एका प्रवाशाला हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्यावर विमानात बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वैमानिकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधला आणि विमानाचे अहमदाबादमध्ये लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.
कडक सुरक्षा तपासणी, शोध सुरू
सकाळी ६.४० च्या सुमारास विमान अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर विमानतळ सुरक्षा पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाचा ताबा घेतला. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून विमानाची आणि प्रवाशांच्या बॅगेची कसून तपासणी करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.
प्रवाशांची सुटका, लवकरच पुढील प्रवास
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची पूर्ण तपासणी केली जात आहे. "आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह सापडलेले नाही, ही अफवा असण्याची शक्यता आहे. मात्र सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आम्ही सर्व तपासणी पूर्ण करत आहोत," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळताच हे विमान दिल्लीसाठी रवाना होईल.