रक्ताच्या थारोळ्यात आढळला राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा मृतदेह, पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 12:20 IST2017-12-06T10:44:02+5:302017-12-06T12:20:53+5:30
राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सरोजिनी नगरमध्ये एका कारमध्ये रिझवानचा मृतदेह आढळला. मृतदेहावर जखमांच्या खुणा असून, मृतदेह सापडला तेथून जवळच त्याच्या हॉकी खेळाडू असलेल्या मैत्रिणीचं घर आहे.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा मृतदेह, पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय
नवी दिल्ली - राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सरोजिनी नगरमध्ये एका कारमध्ये रिझवानचा मृतदेह आढळला. मृतदेहावर जखमांच्या खुणा असून, मृतदेह सापडला तेथून जवळच त्याच्या हॉकी खेळाडू असलेल्या मैत्रिणीचं घर आहे. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र कुटुंबाने हत्येचा संशय व्यक्त केला असून, आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला आहे. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
डीसीपी रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी 10.20 च्या दरम्यान पोलिसांना सरोजिनी नगरमध्ये एका गाडीत मृतदेह असल्याची माहिती मिळाली. स्विफ्ट कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. त्याच्या हातात देशी पिस्तूल होती, तसंच त्याच्या शरिरावर जखमही होती'.
रिझवानचा मोठा भाऊ रियाझुद्दीनचा दुचाकीचा व्यवसाय आहे. हत्या झाली त्यादिवशी रिझवान एका ग्राहकासाठी दोन लाख रुपये घेऊन येत होता असं रियाझुद्दीनने सांगितलं आहे. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'कारमधून तो घरातून निघाला पण 10 वाजले तरी आला नव्हता. फोन केला असता एका तरुणीने फोन उचलला, पण रिझवान कुठे आहे याबद्दल काहीच सांगितलं नाही'.
रिझवान आपले आई-वडिल आणि भावांसोबत तिहार गावात राहत होता. जामिया मिलिया इस्लामियामध्ये ती बीएचं शिक्षण घेत होता.
रियाझुद्दीनने सांगितल्यानुसार, 'ज्या तरुणीने फोन उचलला होता तिने रिझवान संपुर्ण कॅश आपल्याकडे सोडून गेला असून आपण पोलिसांकडे देऊ अशी धमकी दिली. जवळपास 7.15 वाजता तरुणीच्या वडिलांनी फोन करुन आम्हाला त्यांच्या घरचा पत्ता दिला. माझे वडिल आणि काका बॅग आणण्यासाठी गेले होते. तेव्हाच त्यांनी रिझवानची गाडी पार्किंगमध्ये पाहिली. त्याचा मृतदेह ड्रायव्हर सीटवर पडून होता'.
तरुणीच्या कुटुंबियांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 'जर त्यांनी आम्हाला योग्य माहिती दिली असती तर आज आमचा मुलगा जिवंत असता', असं रिझवानच्या वडिलांनी सांगितलं आहे. रिझवान आणि तरुणीची हॉकी प्रॅक्टिसदरम्यान चांगली मैत्री झाली होती अशी माहिती त्याच्या मित्राने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवानची मैत्रीण स्पोर्ट्स टूरसाठी शहराबाहेर होती. असं असतानाही तो कोणाला भेटण्यासाठी तिथे आला होता याचा पोलीस तपास करत आहेत.