"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:01 IST2025-11-15T16:00:37+5:302025-11-15T16:01:37+5:30
. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे."

"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बिहारच्या जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 243 पैकी तब्बल 202 जागा देत पुन्हा एकदा राज्याच्या सिंहासनावर बसवले आहे. तर, राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रणित महाआघाडीला सपशेल नाकारले आहे. एनडीएच्या या विजयाने महाआघाडीला मोठा धक्का बसला. यातच आता, या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित करत, निवडणूक निकालाच्या चौकशीची मागणी केली आहे.
बिहार निवडणूक निकालानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे," असे माकन म्हणाले.
काँग्रेसच्या पराभवावर बोलताना माकन यांनी भाजपच्या स्ट्राइक रेटवर भाष्य केले. "भाजपचा स्ट्राइक रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. 1984 मध्येही काँग्रेसचा स्ट्राइक रेटही असा नव्हता. काही तरी गडबड दिसते," असे माकन यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसचे 61 उमेदवार मैदानात होते. मात्र, एनडीएच्या लाटेत केवळ सहाच जण जिंकू शकले.
#WATCH | #BiharElection2025 | Delhi: After meeting Congress chief Mallikarjun Kharge, party leader Ajay Maken says, "There has been a question mark over the entire election process right from the beginning. When that is the case, results will be unexpected like this. There was… pic.twitter.com/arh1SsGNJm
— ANI (@ANI) November 15, 2025
माकन पुढे म्हणाले, आघाडीच्या सर्व मित्रपक्षांचे म्हणने आहे की, हा निकाल अविश्वसनीय असून याची चौकशी व्हावी. तसेच, राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनियमिततेच्या तक्रारी येत आहेत. काँग्रेस पक्ष 'फॉर्म 17 सी' आणि मतदार याद्यांचा डेटा गोळा करत असून, लवकरच ठोस पुराव्यांसह माध्यमांसमोर येईल.
काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत, 'ही प्रक्रिया संशयास्पद आहे' असे म्हटले आहे. 'ब्रँड मोदी-नितीश' यांच्या ऐतिहासिक कामगिरीसमोर विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला केवळ 34 जागाच जिंकता आल्या.