टी. राजा सिंह यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय, हैदराबादचं राजकारण बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:03 IST2025-07-11T16:02:22+5:302025-07-11T16:03:04+5:30

T. Raja Singh News: भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारल्याने हैदराबाद आणि गोशामहल मदतारसंघातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

BJP takes big decision regarding T. Raja Singh's resignation, Hyderabad politics will change? | टी. राजा सिंह यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय, हैदराबादचं राजकारण बदलणार?

टी. राजा सिंह यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय, हैदराबादचं राजकारण बदलणार?

आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले तेलंगाणामधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आज भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारल्याने हैदराबाद आणि गोशामहल मदतारसंघातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

आमदार राजा सिंह यांनी एन. रामचंदर राव यांना भाजपाचे तेलंगाणामधील प्रदेशाध्यक्ष बनवल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच राजा सिंह यांनी पक्षाच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि चुकीचं नेतृत्व निवडल्याचा आरोप केला होता. मात्र हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आपली कटीबद्धता व्यक्त केली होती. मात्र आता भाजपाने त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना जबर राजकीय धक्का दिला आहे.

टी. राजा सिंह यांना हैदराबादमध्ये टायगर राजा सिंह या नावाने ओळखलं जातं. राजा सिंह हे तेलंगाणाची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. २०१४, २०१८ आणि २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. गोशामहल हा विधानसभा मतदारसंघ ओवेसींच्या एमआयएमचं वर्चस्व असलेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात येतो. मात्र गोशामहल भागात राजा सिंह यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे. अगदी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपाचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले होते, तेव्हा राजा सिंह यांनी मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

राजा सिंह यांनी कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखलं जातं. तसेच गोरक्षण आणि हिंदू समाजाच्या ऐक्यावर ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. राजा सिंह हे बजरंग दल आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले गेलेले आहेत. आता भाजपाने राजीनामा स्वीकारल्यानंतर राजा सिंह यांनी पुढील वाटचाल कशी राहील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Web Title: BJP takes big decision regarding T. Raja Singh's resignation, Hyderabad politics will change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.