नड्डांकडे लवकरच भाजपचे नेतृत्व?; अमित शहा दिल्ली निवडणुकीआधी मुक्त होण्यास उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:28 IST2020-01-14T04:04:10+5:302020-01-14T06:28:35+5:30
नड्डा यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व येत्या दहा दिवसांत गेले की, त्यांच्यासमोर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार घालवण्याचे मोठेच कठीण काम उभे असेल

नड्डांकडे लवकरच भाजपचे नेतृत्व?; अमित शहा दिल्ली निवडणुकीआधी मुक्त होण्यास उत्सुक
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे लवकरच जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे विशेष अधिवेशन एक तर येत्या दहा दिवसांत किंवा दिल्ली विधानसभा निवडणूक संपताच घेतले जाऊ शकते. परंतु, पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारच्या कामकाजावर मला सगळे लक्ष केंद्रीय करायला आवडेल, असे पक्ष नेत्यांना पटवून दिले आहे. आता ‘खाड मास’ हा अशुभ काळ (एक महिना) मंगळवारी मकर संक्रातीच्या दिवशी संपताच प्रक्रियेला वेग येईल.
नड्डा यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व येत्या दहा दिवसांत गेले की, त्यांच्यासमोर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार घालवण्याचे मोठेच कठीण काम उभे असेल. काँग्रेस पक्ष पुन्हा जिवंत झाल्यास तोच एकटा ‘आप’ला दुबळा करू शकतो याच आशेवर भाजप विसंबून आहे. या परिस्थितीत वेळ फारच कमी आहे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे पक्षातील जुन्या नेत्यांना आपलेसे करण्याची व दिल्लीत पक्ष नेत्यांत असलेली गटबाजी दूर करण्याची क्षमता नड्डा यांच्यात आहे.
अंतिम निर्णय दोन दिवसांत
नड्डा यांच्याकडे गेल्या वर्षी जून महिन्यात कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले व अमित शहा हे या ना त्या कारणामुळे अध्यक्षपदावर कायम राहिले. आता अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे.