देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 06:37 IST2020-02-06T05:28:08+5:302020-02-06T06:37:47+5:30

रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारीचे आश्वासन दिले आहे.

BJP ready to send Devendra Fadnavis to rajyasabha; Speeding up the movements in Delhi | देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

- हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याच्या सात सदस्यांसाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन जण सहजपणे विजयी होतील, असे दिसते. दोन जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, त्यासाठी सेनेशी बोलणी सुरू आहेत. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल. निवडून येणाऱ्या सात जणांमध्ये शरद पवार हे निश्चितच असतील. दुसऱ्या जागेसाठी यशस्वी प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचे माजिद मेमन यांना उमेदवारी मिळू शकेल.

रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर निवडून आणून, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे कळते. ते पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील आहेत. राज्यात शिवसेनेच्या मदतीने आता सरकार स्थापन करणे शक्य नसल्याने फडणवीस यांचा केंद्रात उपयोग करून घ्यावा, असे भाजप श्रेष्ठींचे मत आहे.

सध्या राज्यसभेवर असलेले अमर साबळे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी खा. अजय संचेती यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून, उदयनराजे भोसले यांचेही प्रयत्न चालले आहेत. एका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाला महाराष्ट्रातून राज्यसभेवर आणण्याचा भाजपचा विचार आहे.

काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी

शिवसेनेतर्फे यंदा राजकुमार धूत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या खूप आहे. हुसेन दलवाई यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का, याविषयी शंका आहे. रजनी पटेल, राजीव सातव, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक यांची नावे चर्चेत असली तरी पृथ्वीराज चव्हाण हेही राज्यसभेत येण्यासाठी उत्सुक आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक होईल.
 

Web Title: BJP ready to send Devendra Fadnavis to rajyasabha; Speeding up the movements in Delhi