"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:41 IST2025-12-24T17:40:06+5:302025-12-24T17:41:20+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ममता सरकार हिंदूंवर लाठ्या चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
नवी दिल्लीत भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बांगलादेशातहिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करत या घटना अत्यंत लाजिरवाण्या असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ममता सरकार हिंदूंवर लाठ्या चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रदीप भंडारी म्हणाले की, बंगालमध्ये हिंदू आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हे आंदोलक बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत होते. ममता बॅनर्जी आपल्या व्होटबँकेला खूश करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचं सरकार राज्यात तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे. भगवा झेंडा पाहून टीएमसीने लाठीचार्ज केला. हिंदू आंदोलकांवर लाठीचार्ज करणं ही अत्यंत शरमेची बाब आहे.
बंगाल भाजपाचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी या लाठीचार्जला 'रानटी हल्ला' असं संबोधलं. त्यांनी सांगितलं की, महिला आणि वृद्धांना बॅरिकेड्सच्या मागे अडवून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली गेली आणि रस्त्यावर फरफटत नेलं गेलं. ममता बॅनर्जी यांनी आपल्या गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं आता थांबवावं असंही मालवीय यांनी म्हटलं आहे.
२३ डिसेंबर २०२५ रोजी कोलकात्यात 'बंगीय हिंदू जागरण'च्या वतीने 'हिंदू हुंकार पदयात्रा' काढण्यात आली होती. सियालदह येथून बेक बागानमधील बांगलादेश उप-उच्चायुक्तालयाकडे जाणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी वाटेतच रोखलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे १२ जणांना अटक केली आहे. या संघर्षात अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.