भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:09 IST2025-09-29T20:08:16+5:302025-09-29T20:09:53+5:30
पीएम मोदींनी सोमवारी दिल्लीतील नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले.

भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाजप कार्यालयाच्या इमारतीला 'मंदिर' म्हटले. तसेच, भाजप कार्यालये आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतात. भाजपचे दिल्लीशी एक हृदयस्पर्शी नाते आहे. भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानामुळे बळकटी मिळाली. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम सुरूच आहेत, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्ली भाजपला नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे कार्यालय मिळाले आहे. भाजपच्या स्थापनेला ४५ वर्षे झाली. भाजप ज्या बीजापासून एवढ्या मोठ्या वटवृक्षात वाढला, ते १९५१ मध्ये जनसंघाच्या रुपात पेरले गेले. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हा व्ही.के. मल्होत्रा दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष होते. दिल्ली आणि भाजपमधील संबंध केवळ एका शहराचे आणि पक्षाचे नाही, तर सेवा, संस्कृती, आनंद आणि दुःखाच्या काळात पाठिंबा देण्याचे आहे. आधी जनसंघ म्हणून आणि नंतर भाजप म्हणून, आमचा पक्ष नेहमीच दिल्लीच्या हितासाठी वचनबद्ध राहिला आहे.
हमारे लिए कोई भी भाजपा कार्यालय किसी देवालय से, किसी मंदिर से कम नहीं है।
— BJP (@BJP4India) September 29, 2025
कोई भी भाजपा कार्यालय सिर्फ इमारतें नहीं है, ये मजबूत कड़ियां हैं, जो पार्टी को जमीन से, जन-अपेक्षाओं से जोड़े रखती है।
भाजपा सत्ता के लिए नहीं, सेवा के लिए सरकार में है।
ये कार्यालय इसी चेतना को… pic.twitter.com/duaeelXSVW
जनसंघाच्या स्थापनेपासून आम्ही दिल्लीच्या लोकांची सर्व प्रकारे सेवा केली आहे. आणीबाणीच्या काळात जनसंघाच्या नेत्यांनी सरकारी दडपशाहीविरुद्ध दिल्लीच्या लोकांसोबत लढा दिला. १९८४ च्या शीख दंगलींमध्येही दिल्ली भाजपने शीख बांधवांचे रक्षण केले. एनडीए सरकारांनी देशाला सुशासनाचे एक नवीन मॉडेल दिले आहे. आम्ही विकास आणि वारशाच्या मंत्राने पुढे जात आहोत. आम्ही देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आम्ही देशाला मोठ्या घोटाळ्यांपासून मुक्त केले आणि भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढाईत आत्मविश्वास निर्माण केला आहे, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
२०१४ पर्यंत काँग्रेस सत्तेत असताना आयकराची स्थिती काय होती? २ लाख रुपये कमावणाऱ्यांवर कर आकारला जात होता, पण आज १२ लाख रुपये कमावणाऱ्यांवर शून्य कर आकारला जातो. २०१४ पूर्वी कर्जाच्या गरजांसाठी १ लाख रुपये खर्च करणाऱ्या एका सामान्य कुटुंबाला २५ हजार रुपये कर भरावा लागत होता. मात्र, आम्ही जीएसटी लागू केला तेव्हा ही रक्कम कमी झाली. पण आज नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्समुळे खर्च केलेल्या १ लाख रुपयांवर फक्त ६ हजार रुपये कर भरावा लागतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला.